एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे प्रेषित झरथुष्ट्र व हुएन -ए-त्संग यांच्या पूर्णाकृती ब्राँझ पुतळ्याचे अनावरण

 

पुणे :  “सकारात्मक विचार ठेवा, उत्तम कार्य करा आणि चांगले बोला असा संदेश प्रेषित झरथुष्ट्र यांनी मानवतेला दिला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी प्रेम आणि अहिंसेच्या शक्तीच्या आधारे विश्वशांतीसाठी प्रयत्न केले. जगातील सर्व धर्म हाच मानवतावादी संदेश दिला आहे.” असे मत झोराष्ट्रीयन कॉलेजच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. मेहेरे मास्टर मूस यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि माईर्स एमआयटी आर्टस, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या वतीने गांधी जयंतीच्या निमित्ताने पारशी धर्माचे संस्थापक प्रेषित झरथुष्ट्र आणि चीनी बौध्द भिक्षू व महान दूरदर्शी विद्वान विचारवंत तत्वज्ञ हुएन-ए-त्संग यांच्या पूर्णाकृती ब्राँड पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर व जहांगीर रूग्णालयाचे अध्यक्ष जहांगीर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी होते.
तसेच डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड, एडीटी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस व प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होत.
डॉ. मेहेरे मास्टर मूस म्हणाल्या,”जगातील सर्वात मोठ्या विश्वशांती घुमटात दोन महामानवांचे पूर्णाकृती पुतळे स्थापन केल्याबद्दल डॉ. मेहेर मास्टर मूस यांनी डॉ. कराड यांना शुभेच्छा दिल्या. सर्व धर्मांनी आपल्या तत्वज्ञानातून चांगले मानव घडविण्याचा संदेश दिला आहे. त्याआधारेच विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड शिक्षणाच्या माध्यमातून चांगले मानव घडविण्याचा प्रयत्न करत आहेत.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “प्रेषित झरथुष्ट्र आणि तत्वज्ञ हुएन-ए-त्संग यासारख्या महामानवांनी मानवतेला विश्वशांती आणि एकोप्याचा संदेश दिला. सध्या जग गोंधळ, संभ्रम, हिंसाचार आणि दहशतवादाचा सामना करत असताना, या महान व्यक्तींचा संदेश समाजात प्रसृत होणे आवश्यक आहे. त्यापासून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी स्वहितापेक्षा विश्वकल्याणाचा विचार केला पाहिजे आणि ज्ञानाची पूजा केली पाहिजे. विश्वशांती घुमट हा ज्ञान पूजेचे स्थान असून, भारत विश्वगुरू होण्यासाठी समाजाला दिशा देण्याची जबाबदारी पार पाडत आहे.”
जहांगीर म्हणाले,”विश्वशांती घुमटाचा परिसर हा खर्‍या अर्थाने धर्मनिरपेक्ष आहे, तसेच सर्व धर्मीयांचे धार्मिक स्थळ आहे. चांगले बोला, सकारात्मक विचार करा आणि योग्य कृत्य करा, असा संदेश देणार्‍या प्रेषितांचे व महामानवांचे पुतळे सर्वांसाठी प्रेरणादायी असून, हे घुमट एकात्मतेचे मंदिर होवो.”
डॉ. विजय भटकर म्हणाले, “नवीन विचार दाबण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा ते नवीन रुपात पुन्हा उदयास आले आहेत. तक्षशिला-नालंदा ही विद्यापीठे जाळली गेली, तरीही ती विश्वशांती घुमट च्या माध्यमातून पुनःस्थापित होऊन मानवतेला शांततेचा संदेश देत आहेत.”
राहुल कराड म्हणाले, ” या विश्वशांती घुमट परिसरात ५४ महामानवांचे पुतळे असून, त्यांनी मानवतावादाचा पाया रचला, तसेच समाजाला भविष्यवेधी विचार दिला. रस्ते वेगळे असले, तरी अंतिम उद्दिष्ट एकच आहे आणि ज्ञानाचा उपयोग हा मानवाच्या कल्याणासाठी झाला पाहिजे.”
डॉ. आर. एम. चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले.
डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मिलिंद पांडे यांनी आभार मानले.