पुणे : ऑटोनॉमस बाहा एसएई इंडिया 2024 (ए बाहा) च्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय), कोथरूड, पुणे येथे करण्यात आले. या स्पर्धेत भारतभरातील ५ संघ अंतिम फेरीत समाविष्ठ झाले होते. तीन दिवसाच्या चुरशीच्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अडास आणि ऑटोनॉमस तंत्रज्ञानमधील आपल्या अभिनव क्षमतांचे सादरीकरण केले.
ऑटोनॉमस बाहा एसएई इंडिया २०२४ (ए बाहा) हा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या बाहा एसएई इंडिया 2024 या राष्ट्रीय-स्तरावरील स्पर्धेच्या १७ व्या आवृत्तीचा भाग होता.यामध्ये एम बाहा (आयसी इंजिन) आणि ई बाहा (इलेक्ट्रिक) या श्रेण्यांसोबत यावर्षी ए बाहा (ऑटोनॉमस) आणि एच बाहा (हायड्रोजन) श्रेणी सुरु केल्या गेल्या आहेत.
अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटीने या उपक्रमात सक्रिय सहभागी असलेल्या स्वयंसेवकांसह सह-भागीदार म्हणून कार्यक्रमास पाठिंबा दिला.
विद्यार्थ्यांना समग्र शिक्षणाचा अनुभव देण्यासाठी व्हर्च्युअल आणि फिजिकल अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये ही स्पर्धा तीन टप्प्यांत पार पडली.पहिला टप्पा जुलै २०२३ मध्ये अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटी,पुणे यांनी आयोजित केलेल्या प्राथमिक फेरीच्या रूपात झाला, त्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये दुसरा टप्पा, चितकारा विद्यापीठ, चंदीगडद्वारे समर्थित व्हर्चुअल राउंड,ऑक्टोबर 2024 मध्ये ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय), कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.
आयपीएस अकॅडमी,इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड सायन्स, इंदोरच्या टीम आयपीएस प्रिंटर्स ने एकदंर विजेतेपद पटकावले तर अक्रोपोलिस इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च ,इंदोरच्या टीम ऍक्रोराकेर्ज ने दुसरे स्थान तर श्री. विष्णू इंजिनिअरिंग कॉलेज फॉर वुमेन,भीमावरम यांनी तिसरे स्थान पटकावले.
उपस्थितांचे स्वागत करताना एआरएआयचे संचालक डॉ.रेजी मथाई म्हणाले की, बाहा एसएई इंडिया बरोबर एआरएआय अनेक वर्षे काम करत आले आहे. येथे ए बाहा ची पहिली आवृत्ती पार पडणे हे भविष्यातील ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी आमची कटिबद्धता दर्शविते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी लि.चे संचालक व मुख्य कामकाज अधिकारी श्री. राजेंद्र अभंगे यांनी ऑटोमोटिव्ह मोबिलिटी आणि ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग उद्योगावर त्याचा होणारा प्रभावाच्या महत्वावर भर दिला. ते म्हणाले की,कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र हे नाविन्यपूर्ण कल्पना असणारेच नव्हे तर ऑटोनॉमस सिस्टिम्समधील बारकावे समजणाऱ्या अभियंत्यांवर अवलंबून असेल आणि भविष्यातील नेतृत्व तयार करण्यामध्ये ए बाहा महत्वाची भूमिका बजावत आहे.
अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.राकेशकुमार जैन म्हणाले की, बाहा इंडिया मुळे शिक्षण आणि उद्योगातील दरी भरून काढण्यात तसेच संवाद कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन,नेतृत्व,सांघिक कार्यासारख्या कौशल्याबरोबरच अभिनव आणि तंत्रज्ञान कौशल्य आत्मसात करण्यात मदत होते. बाहा एसएई बरोबर आमची भागीदारी म्हणजे एडीवायपीयुच्या ध्येयाशी सुसंगत राहत सहयोगात्मक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सुसज्ज करण्याची आमची कटिबद्धता दर्शविते.
बाहा एसएई इंडिया २०२५ चे सल्लागार डॉ. के. सी. व्होरा यांनी ऑटोमोटिव्ह उद्योगातील उदयोन्मुख तंत्रज्ञानांशी या स्पर्धेशी असलेल्या सुसंगती वर भर दिला. ते म्हणाले की,बाहा एसएई इंडिया २०२४ ची संकल्पना मल्टिव्हर्स ऑफ मोबिलिटी असून यात दोन नवीन श्रेणी सुरु करण्यात आल्या आहेत. ज्या विविध तंत्रज्ञान, ट्रान्सपोर्टेशन मोडस, सुरक्षा आणि शाश्वत उपक्रम प्रतिबिंबित करतात.
समारोपाच्या कार्यक्रमाला मान्यवरांमध्ये एसएई इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ.जी. नागराजन, एटीएसचे व्यवस्थापकीय संचालक रामनाथन श्रीनिवासन,जॅग्वार लॅन्ड रोव्हरच्या बॉडी आणि चॅसीज विभागाचे ग्रुप लीडर डॉ. दिव्यांशु जोशी,बाहा एसएई इंडियाच्या आयोजन समितीचे अध्यक्ष बलराज सुब्रमणियन, बाहा एसएई इंडियाचे सल्लागार डॉ.के.सी.व्होरा,ए बाहा २०२४ चे प्रमुख परीक्षक शंतनू सोनार, काँटिनेंटलचे कन्व्हेनर अरुण शंकर, एआरएआय कडून सहनिमंत्रक उज्वला कार्ले आणि एटीएस कडून सहनिमंत्रक सौरभ चिटणवीस यांचा समावेश होता.
समारोपाच्या दिवशी एआरएआय एएमटीआयएफ आणि इंटेली मोबिलिटी पुरस्कारासह अनेक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.