Deepak Mankar resigned, Deepak Mankar Ajit Pawar group, Deepak Mankar pune,

पुणे  : मागील कित्येक महिन्यापासून राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारांच्या नियुक्त्या प्रलंबित होत्या. या नियुक्त्या कधी होणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले असताना महायुतीमधील सात सदस्यांना काल विधान परिषद सदस्यत्वपदाची शपथ देण्यात आली. हेमंत पाटील, शिवसेना (एकनाथ शिंदे), मनिषा कायंदे, शिवसेना (एकनाथ शिंदे), पंकज भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), इद्रिस इलियास नाईकवाडी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), महंत बाबूसिंग महाराज, बंजारा समाजाचे धर्मगुरु (भाजपा), विक्रांत पाटील (भाजपा), चित्रा वाघ (भाजपा) महायुतीमधील या सात सदस्यांचा समावेश आहे.

या राज्यपाल नियुक्त आमदारकीवरून महायुतीमधीलअजित पवार गटामध्ये नाराजी पाहण्यास मिळाली असून अजित पवार गटाचेपुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांची राज्यपाल नियुक्त आमदारकी देण्यात आली नाही. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या पुणे शहरातील ६०० पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले. त्यामुळे पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र या एकूणच परिस्थितीवर दिपक मानकर यांनी काल कोणतीही भूमिका मांडली नव्हती. कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याने दिपक मानकर काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. त्या पार्श्वभूमीवर दिपक मानकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडताना म्हटले की, मी मागील ४० वर्षांपासून राजकीय आणि समाजिक जीवनात आहे. या संपूर्ण कालावधीत राजकीय जीवनात अनेक पदे भूषविली आणि पदांना न्याय देण्याच काम केले आहे. त्याच दरम्यान मागील दीड वर्षापूर्वी माझ्यावर पुणे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि त्या पदाला न्याय देऊन विविध पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षासोबत जोडण्याचे काम केले आहे.

या संपूर्ण कालावधीत माझ्यावर अजित पवार आणखी जबाबदारी देतील असे वाटत होते. त्याबाबत सांगायचे झाल्यास माझ्यासह शहरातील कार्यकर्त्यांना वाटत होते की, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत माझे नाव असेल पण माझ्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे काल असंख्य कार्यकर्ते नाराज होऊन त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मी देखील माझ्या पदाचा राजीनामा देत असून यापुढील काळात मी कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. ज्यावेळी राज्यपालांकडे नावे पाठविण्यात आली त्यावेळी तरी किमान दादांनी मला विचारले पाहिजे होते. मात्र त्याबाबत विचारणा केली नाही. त्यामुळे दादांना एकच विचारायचे की, दादा मी कुठे कमी पडलो हे सांगावे, मी माझ्या पदाचा राजीनामा देत असून शहरात कायम आपला कार्यकर्ता म्हणून काम करीत राहणार आहे. येत्या दोन दिवसात अजित पवार यांची भेट घेणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. तसेच ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस इलियास नाईकवाडी यांना अजितदादांनी संधी दिली. त्यांचे पक्ष संघटनेतील कार्य किती आहे याबाबत मला माहिती नाही. या दोन सदस्यांपैकी छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांना संधी देण्यात आली असून यांच्याच कुटुंबात किती पदे देणार, हा प्रश्न मनात येतो. तर इद्रिस इलियास नाईकवाडी यांच्या कामाबाबत माहिती नाही. पण एवढेच वाटते की, मी कुठे कमी पडलो हे दादांनी सांगावे ही विचारणा करित त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मानकर पुढे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुरलीधर मोहोळ यांना सर्वाधिक मते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मिळवून दिली आहेत. शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद किती आहे याबाबत मुरलीधर मोहोळ यांना देखील दादांनी विचारावे, अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

आमचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी जेवढी तत्परता रुपाली चाकणकर यांना पुन्हा महिला आयोगाच्या अध्यक्षापदावर पुन्हा संधी देण्यात दाखवली तसेच त्यांच्याकडे महिला प्रदेश अध्यक्ष पद का? राज्यात त्यांच्यापेक्षा अधिक कर्तुत्ववान महिला आहेत ना, जेवढी रुपाली चाकणकर यांचे पद वाढवून देण्याबाबत तत्परता दाखवली तेवढी माझ्याबाबत का नाही दाखवली नाही, असा आरोप मानकर यांनी सुनील तटकरे यांच्यावर केला.