याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) वर्धापन दिन सोहळा ; कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांची उपस्थिती

पुणे : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) च्या वर्धापनदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यांतर्गत वितरित होणारे सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत सृजन युवा कलाकार पुरस्कार व स्व. चंद्रकांत जोशी स्मृतिप्रित्यर्थ युवा उद्योजक पुरस्कार अनुक्रमे लोकप्रिय सुप्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक व निर्माता प्रसाद ओक आणि सर्वत्र टेक्नॉलॉजीज प्रा. लि. चे संस्थापक, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मंदार आगाशे यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी व कार्यवाह श्रीकांत जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला संस्थेचे उपेंद्र केळकर, सचिन पंडित, चैतन्य सराफ, अपूर्वा देवगावकर, मंजुषा वैद्य,अजय कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, आशिष भावे आदी उपस्थित होते.

टिळक स्मारक मंदिर येथे शनिवार, दिनांक १९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. यावेळी संस्थेच्या युवा महिला अध्यक्ष व खासदार प्रा.डॉ. मेधा कुलकर्णी या देखील उपस्थित राहणार आहेत. सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यापूर्वी युवा कलाकार पुरस्कार स्वप्नील जोशी, मनोज जोशी, बेला शेंडे, संदीप खरे, संकर्षण क-हाडे आदींना देण्यात आला आहे.

पुरस्कार वितरण सोहळा, वर्धापन दिन कार्यक्रमासह ब्राह्मण उद्योजकांचे एकत्रीकरण हा देखील कार्यक्रमाचा उद्देश आहे.सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या युवा कार्यकारिणीने केले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ ही संस्था १९४० साली स्थापन करण्यात आली. युवा हा उपक्रम २००४ साली स्व. चंद्रकांत जोशी यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथील अधिवेशनात सुरु करण्यात आला होता.