· चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूट (पुणे), महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (नाशिक), अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान (दिल्ली) यांचा मधुमेह व्यवस्थापन क्षेत्रातील प्रवर्तक संशोधन प्रकल्पात सहभाग
· मधुमेह व्यवस्थापनात पारंपरिक आयुर्वेद उपचार पद्धती ॲलोपॅथिक औषधांसमवेत परस्परपूरक सहयोग कसा स्थापन करु शकते, हे शोधण्यावर संशोधनाचा भर
पुणे : नाशिक स्थित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि पुण्यातील चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूट यांनी संशोधन, शिक्षण व शुश्रूषात्मक निगा या माध्यमातून मधुमेह व्यवस्थापनाच्या विविध पैलूंवर विचारार्थ सहयोग केला आहे. यातील संयुक्तरीत्या शोधली जाणारी एक प्रमुख कल्पना म्हणजे मधुमेह व्यवस्थापनात एकात्मिक उपचार पद्धतींची भूमिका शोधणे म्हणजेच आयुर्वेद उपचार पद्धती आधुनिक ॲलोपॅथिक औषधांसमवेत परस्परपूरक सहयोग कसा स्थापन करु शकते याचा तपास करणे, ही आहे.
या सहयोगात्मक संशोधन पुढाकाराचे उद्घाटन चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटमध्ये नुकतेच एका कार्यक्रमात झाले. याप्रसंगी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठच्या प्र-कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, प्र कुलगुरू डॉ. मिलींद निकुंभ, ब्रिगेडियर (निवृत्त) सुबोध मुळगुंद ,चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य एंडोक्रिनॉलॉजिस्ट डॉ. उन्नीकृष्णन ए. जी., मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. हर्षल मोरे आणि दिल्लीस्थित अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या संचालक डॉ. तनुजा नेसरी उपस्थित होते.
डॉ.माधुरी कानिटकर आपल्या भाषणात म्हणाल्या, “आजच्या जगात विविध शिक्षण शाखांमधील सीमारेषा धूसर होत असून सध्याचे विविध शाखांमधील भिंती पाडून एकत्र काम करण्याची गरज आहे. तेव्हाच आपण भारतातील मधुमेहाच्या वाढत्या ओझ्याला तोंड देऊ शकू.”
डॉ. उन्नीकृष्णन ए. जी. म्हणाले, की मधुमेह व्यवस्थापनात एक बहुशाखीय दृष्टीकोन नवी दिशा देऊ शकेल आणि इतर असंसर्गजन्य रोगांच्या उपचारांत नव्या वाटाही उघडेल.”
डॉ. मिलींद निकुंभ म्हणाले, “व्यक्तीच्या प्रकृतीवर आधारित मधुमेहाच्या समस्येवर उपचाराचा आयुर्वेदाचा एक वेगळा दृष्टीकोन असला तरी आधुनिक औषधांशी समन्वय साधण्याचे मोठे सामर्थ्यही त्यात आहे आणि तेच या सहयोगात्मक अभ्यासातून साधण्याचे ध्येय आहे.”
डॉ. तनुजा नेसरी म्हणाल्या, “ अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान ही आयुर्वेदातील संशोधनाचा प्रसार करणारी देशातील सर्वोच्च संस्था आहे आणि मधुमेह व्यवस्थापनात एकात्मिक अभ्यासाची अमलबजावणी करण्यात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व इतर संस्थांशी सहयोग करताना आम्हाला आनंद होत आहे.”