‘टोस्टमास्टर्स डिस्ट्रीक्ट 125’तर्फे टोस्टमास्टर्स इंटरनॅशनलच्या शताब्दी पूर्ती निमित्त विशेष कार्यक्रम
पुणे : टोस्टमास्टर्स इंटरनॅशनल या जागतिक पातळीवरच्या ‘ना नफा’ तत्त्वावर कार्यरत असलेल्या शैक्षणिक संस्थेचा भाग असलेल्या ‘टोस्टमास्टर्स डिस्ट्रीक्ट 125’तर्फे टोस्टमास्टर्स इंटरनॅशनलच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा शताब्दी उत्सव कार्यक्रम येत्या रविवारी (२७ ऑक्टोबर २०२४) मयूर कॉलनीत एमईएस ऑडिटोरियममध्ये होणार आहे. याप्रसंगी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. भूषण केळकर हे ‘रायडिंग द एआय वेव्ह’ या विषयावर मार्गदर्शन करतील. ही माहिती ‘डिस्ट्रीक्ट 125’चे संचालक मिलिंद पटवर्धन, प्रोग्राम क्वालिटी डायरेक्टर सुशील पवार आणि क्लब ग्रोथ डायरेक्टर कर्नल उदय जगावकर यांनी नुकतीच येथे पत्रकार परिषदेत दिली. पुण्याची नवी ओळख असलेले पुणे मेट्रो हे या उपक्रमाचे मोबिलिटी पार्टनर आहे .
क्लबच्या जागतिक नेटवर्कद्वारे सदस्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून व्यक्तिमत्त्व विकास आणि वक्तृत्व कौशल्य विकास घडवण्यावर टोस्टमास्टर्स इंटरनॅशनलचा भर आहे. सन १९२४ मध्ये स्थापन झालेली, १४० हून अधिक देशांतील १४,००० हून अधिक क्लबमध्ये शेकडो सदस्यांसह कार्यरत असलेली टोस्टमास्टर्स ही जागतिक पातळीवरील अग्रगण्य संस्था बनली आहे.
पुणे, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आणि गोवा राज्यामध्ये डिस्ट्रीक्ट 125 चे २००० सदस्यांचे मजबूत संपर्कजाळे असलेले सुमारे १०० क्लब आहेत.
डिस्ट्रिक्ट 125 चे संचालक मिलींद पटवर्धन म्हणाले की, टोस्टमास्टर्सला १०० वर्ष पूर्ण होणे हा एक महत्वाचा टप्पा आहेच, पण त्याच बरोबर जगभरातील टोस्टमास्टर्स समुदायाच्या माध्यमातून बनलेल्या असंख्य यशोगाथा, परिवर्तन आणि मैत्रीचा हा उत्सव आहे. आपल्या नावकल्पनांसह नवी पिढी टोस्टमस्टर्स चा अद्वितीय प्रवास पुढे घेऊन जातील.
प्रोग्राम क्वालिटी डायरेक्टर सुशील पवार म्हणाले की संज्ञापन आणि नेतृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी टोस्टमास्टर्स हे एक सोपे व किफायतशीर व्यासपीठ आहे. विद्यार्थी, गृहिणी व व्यावसायिक या सर्वांसाठी टोस्टमास्टर्सचे सदस्यत्व परवडणारे आहे. हा पथदर्शक उपक्रम संभाषण कौशल्य, परस्पर संवाद, धोरणात्मक नेतृत्व, व्यवस्थापन आणि आत्मविश्वास या पाच तत्त्वांवर आधारित आहे.
क्लब ग्रोथ डायरेक्टर कर्नल उदय जागावकर म्हणाले की, टोस्टमास्टर्स डिस्ट्रीक्ट 125 खूप लोकप्रिय झाला असून अनेक कंपन्या, महाविद्यालये आणि समुदायांमध्ये टोस्टमास्टर्स क्लब उदयाला येत आहेत. मराठी टोस्टमास्टर्स क्लब, वंडर्स ऑफ वुमन टोस्टमास्टर्स क्लब, रेनबो टोस्टमास्टर्स क्लब यासारखे उपक्रम हे डिस्ट्रिक्ट 125 चे वैशिष्ट्य आहे.
टोस्टमास्टर्स इंटरनॅशनल हे संभाषण कौशल्यासाठी केवळ एक व्यासपीठ नाही – हा आत्मविश्वास निर्माण करण्याचा, नेतृत्व विकास आणि समुदाय प्रतिबद्धतेचा प्रवास आहे. जिथे व्यक्ती केवळ बोलू शकत नाही तर खऱ्या अर्थाने संवाद साधू शकते या संस्थापक डॉ. राल्फ सी. स्मेडली यांनी मांडलेल्या एका साध्या कल्पनेतून टोस्टमास्टर्सचा प्रवास सुरू झाला.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कृपया डिस्ट्रीक्ट 125 च्या www.district125.org, वेबसाइटद्वारे तुमच्या परिसरातील जवळच्या टोस्टमास्टर्स क्लबशी संपर्क साधा. टोस्टमास्टर्सचे कार्य प्रत्यक्ष पाहण्याची ही संधी आहे आणि यामुळे तुम्हाला क्लबमध्ये सामील होण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळेल