वंचित समाजाच्या आरोग्यासाठी आणि सक्षमतेसाठी कार्यरत असणाऱ्या “निरामयसिंहगड रोडपुणे” या संस्थेस यंदाचा “जनसेवा पुरस्कार 2024” प्रदान

पुणे : योग्य जीवनशैलीमुळे आरोग्याचे आदर्श मापदंड राखता येते. हीच चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असे प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी सांगितले. त्यामुळे आनंदी आणि आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी सर्वांनी योग्य पद्धतीची जीवनशैली अंगिकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

जनसेवा सहकारी बँक लि., हडपसर, पुणे च्या वर्धापनदिना निमित्त प्रदान करण्यात येणारा ‘ जनसेवा पुरस्कार’ यंदा पुण्यातील वंचित समाजाच्या आरोग्य आणि सक्षमतेसाठी काम करणाऱ्या “निरामय” या संस्थेस प्रदान करण्यात आला. रोख एक लाख एक लाख रुपये, सन्मान चिन्ह, मानपत्र, श्रीफळ, शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

वानवडी येथील महात्मा ज्योतीराव फुले सांस्कृतिक भवन येथे झालेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात मूत्ररोग तज्ज्ञ डॉ.सुरेश पाटणकर होते. बँकेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ, उपाध्यक्ष श्री. रवि तुपे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिरीष पोळेकर, निरामय संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ एस.के. जैन व्यासपीठावर उपस्थित होते. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते बँकेच्या मोबाईल अॅप चे अनावरण करण्यात आले.

डॉ. जगदीश हिरेमठ म्हणाले की, ज्या पद्धतीने निसर्गाने हृदय बनवले आहे ते अद्भुत आहे . मुठीच्या आकाराचा व ४०० ग्राम वजनाचे आपले हृदय अव्याहतपणे आकुंचन -प्रसारण पावण्यासाठी हृदयाची विशिष्ट प्रकारची रचना आहे . इतर अवयवांचे स्नायू हालचालीने दमू शकतात पण हृदयाच्या स्नायूंना दमण्याची मुभा नसते.

एथेरोस्क्लेरोसिस या हृदयाच्या विकाराबाबत त्यांनी सादरीकरण केले. आयुर्मानापेक्षा सर्वांनी आरोग्यमानावर लक्ष केंद्रित करायला हवे, असे त्यांनी सांगितले.

डॉ. पाटणकर म्हणाले की, व्यक्तीचे आरोग्य चांगले असल्यास , कुटुंबाचे आणि परिणामी राष्ट्राचे आरोग्य चांगले राहते . भारतीय आचार विचार पद्धती आपण विसरलो आहोत. आहार, विहार आणि आचारणाबाबत पालकांनी शिकवलेल्या गोष्टी आपण विसरलो आहोत. अस्थिर चित्तामुळे आपण सतत पळत असतो. आजची जीवनशैली हा आजार नसून विकार आहे, ज्याचे रूपांतर आजारामध्ये होते.

पारंपरिक आणि आधुनिक शास्त्रीय पद्धती एकत्र आणल्यास मानवी जीवनाचे बरेचसे आजार कमी होऊ शकतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

बँकेचे अध्यक्ष डॉ. हिरेमठ यांनी बँकेच्या वर्षभरातील कामगिरीवर प्रकाश टाकला. कोविड काळामध्ये निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थिती नंतर दि.30.09.2024 अखेर बँकेचा एनपीए (NPA)(अनुत्पादक मालमत्ता) १२% टक्क्यांवरून आता १.२७% टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात यश मिळवले आहे. बँकेची दि.23.10.2024 अखेर ठेवी रक्कम रु.1930.92 कोटी इतकी आहे आणि कर्जे रक्कम रु.1000.43 कोटी इतके असुन, बँकेचा एकूण व्यवसाय रु.2931.34 कोटी इतका आहे.  पारदर्शी व्यवहार हे बँकेचे वैशिष्ट्य आहे.

तरुण पिढीच्या गरजा लक्षात घेऊन बँक अद्ययावत तंत्रज्ञानामध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. महिलांमध्ये आर्थिक साक्षरता तसेच कर्मचारी प्रशिक्षण आणि त्याद्वारे मनुष्यबळ विकास, भविष्यातील शाखा विस्तार, अनुपालन संरचना , पर्यावरण पूरक कामकाज, अक्षय्य ऊर्जेचा वापर अशा बँकेच्या विविध उपक्रमांबाबत त्यांनी माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी पोळेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. बँकेने यंदा एक हजार कोटी रुपयांचा कर्ज वितरणाचा टप्पा पार केल्याची त्यांनी माहिती दिली.

निरामय संस्थेचे अध्यक्ष अॅड.एस.के.जैन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जनसेवा बँकेने दिलेला पुरस्कार हा आमच्या साठी प्रेरणादायी आहे. आम्ही यापुढेही अशाच पद्धतीने काम सुरू ठेऊ, असे त्यांनी सांगितले. श्री सुहास शामगावकर यांनी स्वागत गीत सादर केले. अभिजित केळकर यांनी मानपत्राचे वाचन केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. श्री. रवि तुपे यांनी आभार मानले . पसायदानाने समारंभाची सांगता झाली.