आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील चतुर्थश्रेणी मतदान सहायकांचे प्रशिक्षण संपन्न
पुणे : विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार पाडावी यादृष्टीने नियुक्त केलेल्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील चतुर्थश्रेणी मतदान सहायकांचे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात संपन्न झाले.
निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी मार्गदर्शन करतांना मतदान सहायकाची भूमिका आणि जबाबदाऱ्यांची माहिती यावेळी दिली. निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक घटक महत्वाचा असून सोपविलेली जबाबदारी व्यवस्थीतपणे पार पाडण्यासाठी सांघिक भावनेने काम केले पाहिजे. समन्वयातून कोणतेही काम सहजतेने पार पाडता येते. मतदान सहायक हा निवडणूक प्रक्रियेतील महत्वाचा घटक असून त्यांनीही मतदारांना 100 टक्के मतदान करण्याचे आवाहन करण्याच्या उपक्रमात सहभाग घ्यावा, भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे, अशा सूचना श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.
यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय नागटिळक, निवडणूक नायब तहसिलदार डॉ. सचिन वाघ आदी उपस्थित होते. श्री. वाघ यांनी देखील प्रशिक्षणादरम्यान मार्गदर्शन केले.