मतदार जनजागृती अभियान तळागळापर्यंत पोहचविण्याचा ज्येष्ठ नागरिक महासंघाचा निश्चय

 

पिंपरी :  पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या मासिक सभेत सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदान करण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेले मतदार जनजागृती अभियान शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघांपर्यंत पोहचवून मतदानाचा संदेश तळागळापर्यंत पोहचवणार असल्याचे मत महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ यांनी व्यक्त केले.

सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणाखाली मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने आज संत तुकाराम नगर येथे पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या मासिक सभेत मतदान जनजागृती अभियान उपक्रम राबविण्यात आला. उपलेखापाल अनिल कुऱ्हाडे, मुख्य लिपिक किसन केंगले, महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ, बाबुराव फुले, ईश्वरलाल चौधरी, शांताराम सताव, हेमचंद्र जावळे, रामदास जगदाळे, तुकाराम कुदळे, माधव अडसुळे, सुनिता कोकाटे, अरुण बागडे, बाळकृष्ण गायकवाड महापालिकेचे विकास गायकांबळे, ओंकार पवार, पियुष घसिंग यांच्यासह शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, सदस्य, प्रतिनिधी शेकडोच्या संख्यने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी निवडणुकीत मतदान करण्याची शपथ घेतली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या मतदार संघात सरासरी ५० टक्के मतदान होते. ही आकडेवारी आपल्या शहराच्या वैभवाला शोभणारी नाही. त्यामुळे निवडणुकीत मतदान करणे हे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य असून ते कर्तव्य प्रत्यकाने चोखपणे पारपाडणे आवश्यक आहे. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी शहरातील सुमारे १५० पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक संघांमध्ये मतदानाचा हा संदेश पोहचविण्याचा महासंघ प्रयत्न करणार असल्याचे वृषाली मरळ म्हणाल्या.

दरम्यान, महापालिकेच्या विविध १५ मोठ्या क्रीडांगणावर मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आला. यावेळी मैदानावर उपस्थित खेळाडू, नागरिक यांना मतदानाची शपथ देण्यात आली. तसेच महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत शहरातील विविध वस्तींमध्ये जाऊन मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.