सिद्धार्थ ग्रंथालय यांच्या वतीने आयोजित पूर्व भागातील ‘दिवाळी पहाट’, ‘दिवाळी अंक’ शुभारंभ उत्साहात संपन्न

पूर्व भागातील आजची दिवाळी पहाट म्हणजे सर्वधर्मीयांची दिवाळी ही संकल्पना माजी राज्यमंत्री व संस्था अध्यक्ष बाळासाहेब शिवरकर, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व संस्था कार्याध्यक्ष बापूसाहेब गानला यांनी अथक परिश्रमाने साकारली.
सिद्धार्थ ग्रंथालय, पुणे यांचे वतीने आयोजित ‘दिवाळी पहाट व दिवाळी अंक शुभारंभ’ प्रसंगी राणी लक्ष्मीबाई उद्यानातील संगीत समारंभात २००७ पासून पूर्व भागात भारतीय संस्कृतीचे केलेले जतन ही पुणेकरांना व कॅम्प परिसरातील नागरिकांना अभिमानास्पद घटना असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास त्रिशक्ती फौंडेशनचे अध्यक्ष कर्नल संभाजी पाटील (निवृत्त), पुणे कॅन्टोन्मेंट सह. बँकेचे ज्येष्ठ संचालक कैलासभाऊ कोद्रे, शांताराम चौधरी, पोपट गायकवाड, जयमल्हार नागरी सह. पतपेढीचे अध्यक्ष त्रिंबक बारावकर, प्रसिध्द पॉवर लिफ्टर मा. शाम सहानी, विकास भांबुरे, विजय भोसले, असिफ शेख, प्रदीप खोले, संदीप भोसले, शशिधर पूरम, विनायक काटकर, राजेंद्र म्हस्के, पुणे कॅन्टोन्मेंट शांतता कमिटी सदस्य तसेच पुणे शहर व कॅम्प परिसरातील संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूर्व भागातील या सर्वधर्मीयांना संगीताच्या माध्यमातून श्रवनीय मराठी, हिंदी गाणी, गझल, देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून खिळवून ठेवल्याची भावना कर्नल संभाजी पाटील (निवृत्त) यांनी व्यक्त केली.
सुप्रसिध्द गायक राहुल घोरपडे, श्रुती करंदीकर, अश्विनी वझे, कुमार करंदीकर, सौरभ दफ्तरदार यांनी आपल्या सुरेल आवाजाने दिवाळीची पहाट गाजविली. कार्यक्रमासाठी साथसंगत निलेश श्रीखंडे, विलास क्षीरसागर, अथर्व क्षीरसागर, सईद खान यांनी दिली. कार्यक्रमाचे निवेदन सुमेधा दफ्तरदार व नितीन देशपांडे यांनी केले. ध्वनी व्यवस्था सुजित खांबे यांनी सांभाळली.

सुरेल संगीत, साथसंगीत व सप्तसुरांचा उत्तम मेळ आनंद अनुभवयाला उपस्थितांना मिळाला. विविध मराठी-हिंदी गीते, भाव-भक्तीगीते तसेच भजन सादर केल्यानंतर रसिकांची दाद मिळविली. त्यामध्ये प्रभात समयी या गाण्याने सुरुवात करुन दिलका भवर करे पुकार या गाण्याने मैफिलीची सांगता झाली.
या निमित्ताने ‘ वर्षभर दिवाळी अंक वाचा’ या योजनेचा देखील उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला.
यानिमित्ताने राणी लक्ष्मीबाई गार्डन रंगीबेरंगी विद्युत रोषणाई व रांगोळीने खास सुशोभित करण्यात आले होते. ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष बापूसाहेब गानला यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर कार्यवाह बाळकृष्ण सातपुते यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व गायक आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात येऊन उपस्थितांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला.