बंधुत्वाचे नाते जपणारी देवदासी महिलांसोबत ‘आपुलकीची भाऊबीज’ जनता बँक स्टाफ वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आयोजन.

पुणे : समाज हे आपले मोठे कुटुंब आहे आणि या कुटुंबातील प्रत्येकाशी आपले नाते आदरपूर्वक जपले पाहिजे. आपल्या कुटुंबात आपण एकमेकांवर अवलंबून असतो. त्याचप्रमाणे समाजात देखील असते. एकमेकांवर अवलंबून एकमेकांना मदत करणारा समाजच जिवंत असतो, ही वृत्ती भारतीय समाजात आहे. भारतीय समाजाने ती टिकवून ठेवली आहे. नाती समृद्ध ठेवायची असतील तर सामाजिक जीवन जिवंत ठेवायला पाहिजे. सुख आणि दुःखाची देवाण-घेवाण ज्या समाजात असते तो समाज जिवंत असतो, असे मत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष स्मिता कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

जनता बँक पुणे स्टाफ वेल्फेअर असोसिएशन, जनता बँक पुणे कला क्रीडा मंडळ, जनता बँक गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने आपुलकीची भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार पेठेतील श्री नामदेव शिंपी समाज कार्यालयात देवदासी महिलांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. यावेळी जनता बँकेचे अध्यक्ष रवींद्र हेजीब,उपाध्यक्षा ॲड. अलका पेटकर ,मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप, जनता वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उपाध्यक्ष अभय ढमाले, कोषाध्यक्ष सचिन आंबेकर, शरद शिंदे, विजय धोत्रे, अविनाश निरगुडे उपस्थित होते.

 

स्मिता कुलकर्णी म्हणाल्या, कुटुंब आणि समाज चांगल्या पद्धतीने चालवायचा असेल तर सहकार्य, समर्पण आणि त्याग आवश्यक आहे. जनता बँक स्टाफ वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित भाऊबीजेतून मायेची अनुभूती येते. चांगले काम केले तर समाज त्याला नकार देत नाही आणि काही काळाने हे काम समाजाचे होऊन जाते आणि समाज देखील त्यात योगदान देत असते. असेही त्यांनी सांगितले.

रवींद्र हेजीब म्हणाले, जनता बँकेचा समाजाप्रती असलेला जिव्हाळा, प्रेम याचा भाग म्हणजे ही आपुलकीची भाऊबीज आहे, असेही त्यांनी सांगितले. ॲड अलका पेटकर म्हणाल्या, आत्ताचे जग हे डिजिटल झाले आहे. आपण सणाच्या शुभेच्छा व्हाट्सअप च्या माध्यमातून देतो. त्यामुळे प्रत्यक्ष भाऊबीज साजरी करून सामाजिक समरसता जनता बँक स्टाफ वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून साधली जात आहे. भाऊ आणि बहीण आपले सुख- दुःख एकमेकांसोबत वाटून घेतात. यातूनच हळूहळू समाज एकत्र येतो.

जगदीश कश्यप म्हणाले, सन १९४९ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून जनता बँकेची स्थापना झाली. म्हणजे केवळ बँकिंग न करता आर्थिक मदती सोबतच सामाजिक बांधिलकी देखील बँकेच्या माध्यमातून जपली जाते.

किशोर चव्हाण म्हणाले, जनता बँकेतील कर्मचाऱ्यांच्या सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून आपुलकीची भाऊबीज दरवर्षी साजरी केली जाते.जनता बँकेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने बुधवार पेठेतील ७५ देवदासी भगिनींसोबत भाऊबीज साजरी करुन त्यांना धान्य किट ,मिठाई व साडीचोळी भेट देण्यात आले. सूत्र संचालन शरद शिंदे यांनी केले तर सचिन आंबेकर यांनी आभार मानले.