निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मतदान केंद्रावर व्यवस्था करावी
पुणे :- भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सेक्टर अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवरील व्यवस्थेची सूक्ष्म पाहणी करुन चोख नियोजन करावे. त्यांच्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांसोबत शांत व सौदार्ह भावनेने राहून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे व शांत वातावरणात पार पाडावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिले.
थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील बापुजी बुवा सभागृहात विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने चिंचवड विधानसभा मतदारसंघात नियुक्त सेक्टर अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार बोलत होते. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, सेक्टर अधिकारी समन्वय अधिकारी अजिंक्य येळे, मतमोजणी आराखडा तथा मतदान केंद्र समन्वय अधिकारी शिरीष पोरेडी यांच्यासह सेक्टर अधिकारी, सहायक सेक्टर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्री.पवार म्हणाले, सेक्टर अधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, लाईट व्यवस्था, दिव्यांग तसेच ज्येष्ठ मतदारांसाठी व्हीलचेअर व्यवस्था, शौचालयांची व्यवस्था व स्वच्छता, मंडप, टेबल व खुर्च्या आदींच्या व्यवस्थेबाबत आढावा घ्यावा. १० पेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या शाळांच्या ठिकाणी मतदारांना जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग ठेवावा, मतदान केंद्रांवर होणाऱ्या गर्दीचे योग्य व्यवस्थापन करावे, प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असल्याची खात्री करावी तसेच त्यात मतदारांची रांग देखील दिसेल अशा पद्धतीने वेबकास्टिंग कॅमेरे लावावेत, मतदान केंद्राच्या इमारत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्याची खात्री करावी, जनरेटरची राखीव व्यवस्था करावी, एन्ट्री आणि एक्झिट पॉइंटची पाहणी करावी, मतदान यंत्रांचे साहित्य वाटप, मॉकपोल, मतदानाच्या दिवशी दर दोन तासांनी होणाऱ्या मतदानाचा अहवाल द्यावा आदी सूचना पवार यांनी यावेळी केल्या. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत समन्वय ठेवावा, असेही त्यांनी सांगितले. मतदान केंद्रांवरील देण्यात येणाऱ्या सुविधांचा सर्वंकष आढावा यावेळी घेण्यात आला.