कॅन्टोन्मेंट मतदार संघात ९३ मतदारांनी केले गृहमतदान
पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा (अ.जा.) मतदारसंघांतर्गत ८५ वर्षांवरील ९१ ज्येष्ठ नागरिक व ६ दिव्यांग अशा एकूण ९७ मतदारांनी अर्ज क्रमांक १२ ड भरून गृहमतदानासाठी नोंदणी केलेल्या ८५ वर्षांवरील ८९ ज्येष्ठ नागरिक व ४ दिव्यांग मतदार अशा एकूण ९३ मतदारांनी गृहमतदान केले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी गृह मतदानाची सुविधा भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. त्याअनुषंगाने ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सिध्दार्थ भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मतदानाची प्रक्रिया करण्यात आली. टपाली मतदान कक्षाचे समन्वय अधिकारी पी.के. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारांचे गृह भेटीत मतदान करून घेण्यासाठी एकूण ८ पथकांचे गठन करण्यात आले होते. त्यामध्ये एक मतदान अधिकारी, एक इतर अधिकारी, एक पोलीस कर्मचारी व एक शिपाई, एक व्हिडिओ ग्राफर व एक सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश आहे. गृह मतदानासाठी कार्यरत असणाऱ्या विशेष पथकाद्वारे ही प्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सिध्दार्थ भंडारे यांनी दिली.