(शुक्रवार, दि. २२ नोव्हेंबर ते गुरुवार, दि.२८ नोव्हेंबर २०२४)
पुणे : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. २२ नोव्हेंबर ते गुरुवार, दि.२८ नोव्हेंबर २०२४ या दरम्यान तत्त्वज्ञ संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२८ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने दरवर्षी प्रमाणेच ‘जागतिक सहिष्णुता सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त होत असलेल्या या सप्ताहात ‘श्रीसंत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’, विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे भजन, कीर्तन, प्रवचन यासह लोकप्रबोधनपर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या सप्ताहाचे उद्घाटन शुक्रवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वा. होणार आहे. या सोहळ्याला जगप्रसिध्द संगणकतज्ञ, प्रमुख मार्गदर्शक व नालंदा विद्यापीठाचे माजी कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर, आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थचे अध्यक्ष ह.भ.प. श्री. मारुती महाराज कुर्हेकर, श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीचे अध्यक्ष ह.भ.प. श्री. किसन महाराज साखरे, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, आळंदी देवस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, विश्वस्त डॉ. भावार्थ रा. देखणे, देहू येथील श्री तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष श्री.पुरुषोत्तम महाराज मोरे, श्री क्षेत्र देहू नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. पूजाताई दिवटे, आळंदी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, श्री. सुरेश काका वडगांवकर, श्री विठ्ठल-रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट, मावळ, पुणेचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब काशिद हे उपस्थित राहणार आहेत.
‘विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातून विश्वशांती’ या स्वामी विवेकानंदांच्या वचनानुसार सुदृढ, निकोप व सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी पवित्र तीर्थक्षेत्रांचे खर्या अर्थाने ज्ञानतीर्थ क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडविण्याच्या हेतूने सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन केले जाते. बंधुत्व, मानवी हक्क, लोकशाही, सर्वधर्मसमभाव, विज्ञान व अध्यात्माचा समन्वय आणि सहिष्णुता अशा विविध विषयांवरील लोकशिक्षणाचा व समाजप्रबोधनाचा हा सोहळा आहे.
या सोहळ्यात सकाळी ९.३० ते १२.३० वाजेपर्यंत ह.भ.प. श्री. उध्दव महाराज पाटील रमजानपूरकर, ह.भ.प. श्री. प्रकाश महाराज बोधले, शिवशंभू चरित्र व्याख्याते ह.भ.प.श्री धर्मराज महाराज हांडे, ह.भ.प. नारायण महाराज उत्तरेश्वर-पिंपरीकर व अच्युत महाराज दस्तापूरकर यांची कीर्तने होणार आहेत. तसेच मान्यवरांच्या शुभहस्ते हरिपाठ व इंद्रायणी मातेची आरती होईल.
या सोहळ्या निमित्ताने दररोज संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत व्याख्याने व प्रवचन होतील. यामध्ये सुफी संत व इस्लाम धर्माचे अभ्यासक लतिफ पटेल, नासिक येथील भागवताचार्य स्वामी डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे, संत साहित्याचे अभ्यासक हभप डॉ. रविदास महाराज शिरसाठ, संत बुवासाहेब ठाकुर बुवा दैठणा या फडकरी परंपरेतील सहावे वंशज हभप डॉ . तुकाराम महाराज गरूड ठाकुरबुवा दैठणेकर, राजस्थान बासवाडा येथील श्री श्री १००८ महामंडलेश्वर अनंत विभूषित ध्यानयोगी महर्षि उत्तम स्वामी जी महाराज आणि जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचे वंशज हभप बापूसाहेब मारे देहूकर यांचे प्रवचन होतील.
दररोज संध्याकाळी ७.१५ ते रात्री ९ या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प श्री अर्जुन महाराज लाड गुरूजी, भागवताचार्य बालयोग ह.भ.प.श्री हरिहर महाराज दिवेगांवकर, रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक ह.भ.प. श्री किसनमहाराज साखरे व वै.बाबामहाराज सातारकर यांचे नातू ह.भ.प. श्री. चिन्मय महाराज सातारकर यांची सुश्राव्य कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत.
रात्रीच्या ९.१५ ते ११.३० च्या सत्रात विश्वशांती संगीत कला अकादमी, राजबाग, पुणे येथील शिक्षक व विद्यार्थी यांचा विश्वशांती दर्शन हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम, भजन सम्राट निवृत्तीबुवा चौधरी यांच्या शिष्या सौ. श्रृती पाटील यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक राधाकृष्ण गरड गुरूजी व सहकारी यांचा सांप्रदायिक अभंग गवळणीचा कार्यक्रम, रुपक कलासदन च्या संस्थापक मानसी वझे प्रस्तुत अभंग वेध, हा परंपरेतील नवतेचा एक नृत्यात्मक शोध असेल. तसेच सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक डॉ. आशिष रानडे, नासिक यांचा संतवाणी हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम होणार आहे.
संतश्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२८ व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने, गुरूवार दि.२८ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वा. ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन होऊन त्यानंतर घंटानाद व महाप्रसाद होऊन या सप्ताहाची सांगता होईल.
अशी माहिती श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीचे समन्वयक डॉ. सुनील कराड आणि प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी दिली.