धर्म आणि विज्ञानाच्या समन्वयातूनच विश्व शांती नांदेलआध्यात्मिक गुरू पं. विजयशंकर मेहता यांचे प्रतिपादन : एमआयटी डब्ल्यूपीयूत
२९वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन.

पुणे:  “धर्म आणि विज्ञान यांचा समन्वय घरा घरात झाला तर प्रत्येकाला शांतीचा अनुभव घेता येऊ शकतो. हेच सूत्र समाजासाठी लागू झाल्याने विश्वशांती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. तसेच प्रत्येकाने चेहर्‍यावर हास्य ठेवणे या क्रांतिकारी प्रयोगामुळे ही जीवनात शांतीचा अनुभव येतो. प्रत्येकाने संकल्प करावा की घरामध्ये प्रवेश करतांना चेहर्‍यावर हास्य ठेवावे.” असे विचार उज्जैन येथील आध्यात्मिक गुरू व लेखक पंडित विजयशंकर मेहता यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधित आयोजित २९वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संतश्री ज्ञानेश्वर सभागृह, कोथरूड, पुणे येथे झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या प्रसंगी संत एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज ह.भ.प.श्री. योगीराज महाराज गोसावी पैठणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून होते. तसेच जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय पाहुणे होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस व २९ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे समन्वयक व प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.
पंडित विजयशंकर मेहता म्हणाले, “संतती, संपत्ती, संबंध आणि  दुर्बल आरोग्य  या चार मार्गाने जीवनात अशांती येते. अशा वेळेस शांतीसाठी जीवनाला चार टप्प्यांमध्ये विभाजीत करावे. व्यावसायिक जीवनात निष्काम राहणारे, सामाजिक जीवनात वचन बद्धतेचे पालन करणे, कुटुंबाला प्राथमिकता देणे आणि स्वतःला शांत ठेवावे. यामुळे कुटुंबात, समाजात आणि संपूर्ण विश्वात शांती नांदेल.”
ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी पैठणकर म्हणाले,” भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ असून जगाला वारकरी संप्रदायाने शांतीचा मार्ग दाखविला आहे. आजच्या युगामध्ये अध्यात्म आणि विज्ञानाची वेगळी परिभाषा करणे योग्य नाही. आत्म स्वरूपाचा विचार करणे हे अध्यात्म असून ते सर्व धर्मात आहे. खर पाहता विश्वाला शांतीची गरज आहे आणि ती विज्ञानातून मिळेल. मनुष्याने ज्ञानाचा योग्य वापर केल्यास ते शक्य आहे. ज्ञान हे आंतरिक विचार करतो त्यासाठी रोज संतांचे वाङ्मय वाचावे.”
डॉ. विजय भटकर म्हणाले,” वर्तमान काळात मानवाने विज्ञानाच्या आधारे सर्व गोष्टी साध्य केल्यात परंतू जीवनात सुख आणि शांती नाही. यासाठी आध्यात्मिक व आत्मज्ञान आवश्यक आहे. सत्याची परिभाषा ओळखणे गरजेचे आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली व जगदगुरू तुकाराम महाराज यांचा संदेश मानवजातीपर्यंत पोहचविण्याच्या मुख्य उद्देश्याने ही व्याख्यानमाल सुरू केली आहे. येथे सद्गुणांची पूजा हीच खरी ईश्वरसेवा पूजा आहे. मन आणि आत्मा या गोष्टींचे अधिक चिंतन व्हावे. जीवनाचा हेतू व कर्तव्य काय आहे याची जाणिव यातून होते. ”
डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले,”धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे जीवनात सर्वात महत्वाचे असून त्याचे पालन करावे. देशाचा विकास पाहता भारत तीसरी आर्थीक व्यवस्था म्हणून उदयास येत आहे. अशा वेळेस हा देश भविष्यात जगाचे नेतृत्व करेल आणि विश्वगुरू बनेल.”
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागत पर भाषण व प्रस्तावना मांडली.सूत्रसंचालन प्रा. डॉ. मिलिंद पात्रे यांनी केले.