पुणे  : जगविख्यात मधुमेह संशोधक आणि केईएम हॉस्पिटलच्या डायबेटिज युनिटचे प्रमुख डॉ.चित्तरंजन याज्ञिक यांनी आतापर्यंत डायबेटिज युनिट तर्फे करण्यात आलेले संशोधन आणि पुढचा मार्ग याबाबत माहिती दिली. आठव्या डॉ.बानू कोयाजी स्मृती व्याख्यानात भारतीय लोकांमधील मधुमेह या विषयावर डॉ.याज्ञिक यांनी सादरीकरण केले.

डॉ.याज्ञिक म्हणाले की,डॉ.बानू कोयाजी यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी हे एक योग्य व्यासपीठ आहे.डॉ.कोयाजी यांनी डायबेटिस युनिट स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि आज हे युनिट मधुमेह संशोधनातील उत्कृष्टता केंद्र बनले आहे.

डॉ.याज्ञिक म्हणाले की, केईएम हॉस्पिटल पुणे येथील डायबेटिस युनिटची स्थापना १९८७ साली झाली आणि पश्चिम भारतातील पहिले असे केंद्र होते.या केंद्राने रूग्णसेवा,रूग्ण प्रशिक्षण आणि संशोधन या तीन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.संशोधनाच्या बाबतीत केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटर हे भारतीयांमध्ये मधुमेह इतका सामान्य का याचा शोध सुरू करणाऱ्या पहिल्या केंद्रांपैकी एक आहे.त्यातील पहिला निष्कर्ष हा मुख्यत्वे लठ्ठपणा (पोटाचा घेर – पोटाच्या आतील व बाहेरील भागात साचणारी अतिरिक्त चरबी) याच्याशी संबंधित होता. त्यानंतर या केंद्राने थिन-फॅट इंडियन ही संकल्पना समोर आणली.याचा अर्थ भारतीयांची शरीरयष्ठी जरी बारीक असली तरी शरीरात भरपूर चरबी असू शकते. म्हणजे स्नायू कमी, जास्त चरबी,पोटाचा घेर व बारीक हातपाय. भारतीयांमध्ये मधुमेह का जास्त आहे,हे या संकल्पनेने स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की,मुलत: मधुमेह अनुवंशिक कारणामुळे होतो,असे मानले जायचे.परंतु प्रा.डेव्हीड बार्कर यांच्या बरोबर सहयोग करून केलेल्या संशोधनात असे दिसून आले की,मूल आईच्या पोटात असतानाच हे सुरू होते.मातेचे पोषण,चयापचय,तणाव आणि आई आणि मुलामधील इतर अनेक घटकांमुळे भारतीय बालके छोटी दिसतात,पण पाश्चात्य देशातील बालकांपेक्षा जास्त चरबी असते.संशोधनाच्या पुढच्या टप्प्यात केईएम हॉस्पिटलमधील डायबेटिस युनिटने विटामिन बी १२आणि फोलेट असंतुलन याचे महत्त्व अधोरेखित केले.यानंतर तरुण महिलांना बी १२ आणि इतर सुक्ष्म अन्नद्रव्ये देऊन कालांतराने त्यांच्या बालकांमधील परिणाम यावर अनेक वर्षे संशोधन करण्यात आले. ही चाचणी पूर्ण झाली असून आता असे दिसून येत आहे की,सामाजिक,आर्थिक विकास आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये पोषणामुळे गर्भाशयातील बाळाच्या वाढीदरम्यान अतिरिक्त चरबीवर हळूहळू मात करू शकलो आहोत. ही भारतीय लोकसंख्येमध्ये सुधारणा होण्याची एक सुरूवात आहे.याला सरकार आणि इतर संस्थांनी साहाय्य करणे गरजेचे आहे.तरुण मुलामुलींचे आरोग्य सुधारू शकलो तर पुढची पिढी ही निरोगी होण्यास मदत होईल.

रेणवीय यंत्रणा हा संशोधनाचा पुढील टप्पा

डॉ.याज्ञिक पुढे म्हणाले की, मधुमेह हा विकार जेनेटीक्स पेक्षा एपिजेनेटिक्स बदलांद्वारे प्रेरित आहे,असे आम्हाला वाटते. या अभ्यासामुळे आपण काय करावे? कसे करावे? आणि सरकारी धोरणे कशी आखली जाऊ शकतात,याची स्पष्टता येऊ शकते.संशोधनाकडून आता संशोधनाबाबत लोकशिक्षण करण्यावर आमचा भर असेल,ज्यामुळे सरकारी धोरणे आणि उपक्रमांना आकार दिला जाऊ शकतो आणि याचा फायदा मोठ्या लोकसंख्येला होऊ शकतो.

उत्कृष्टता केंद्र

केईएम हॉस्पिटल,पुणे येथील डायबेटिस युनिटने हजारो टाईप २ आणि शेकडो टाईप १,गर्भावस्थेमधील मधुमेह व मधुमेहाच्या इतर प्रकारांवर उपचार केले आहेत.येथील क्लिनिकमध्ये टाईप १ मधुमेह असलेल्या १५०० हून अधिक मुलांची नोंद आहे आणि हिंदुजा ट्रस्ट,मुकूल माधव फाऊंडेशन आणि नित्याशा फाऊंडेशन यांच्या मदतीने अनेकांना मोफत उपचार मिळत आहेत.रूग्णांना त्यांच्या दैनंदिन व्यवस्थापनाविषयी प्रशिक्षित केले असून स्वावलंबी बनविण्यास या युनिटने मदत केली आहे.क्लिनिकला भेटीदरम्यान दरी भरून काढण्यासाठी टाईप १ डायबेटिस रूग्णांसाठी सक्रीय ऑनलाईन कार्यक्रम आयोजित केले जातात.या युनिटने विकसित केलेले मधुरक्षा ॲप्लिकेशन हे हजारो टाईप १ मधुमेह रूग्णांनी डाऊनलोड केले आहे. टाईप १ मधुमेह असलेल्या रूग्णांसाठी हे एक रेडीरेकनर म्हणून काम करते आणि मुलभूत जगण्याची कौशल्ये याबाबत शिक्षित करते.रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी जेवण आणि इन्शुलिनच्या डोसचे मोजमाप करण्यासाठी कॅलक्युलेटर देखील या ॲपमध्ये आहे