पिंपरी /पुणे : दामिनी सखी उपक्रमाचा एक भाग म्हणून दापोडी स्थित अलिमा इंडिया कंपनीने माहिती साहित्य असलेल्या जनजागृती मोहिमेला निधी स्वरूपात योगदान दिले आहे.संकटाच्या परिस्थितीत हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध असतील याची खात्री करण्यासाठी अलिमा इंडियाने बस मोहिम सुरू केली आहे.पिंपरी-चिंचवडमध्ये हजारो महिला दैनंदिन प्रवासासाठी वाहतूकीवर अवलंबून असतात.गरज असल्यास महिलांना आपात्कालीन हेल्प लाईन क्रमांक उपलब्ध असतील,याची खात्री करण्यासाठी अलिमा इंडियाने बस जाहिरात मोहिम सुरू करून महिला सुरक्षेप्रती आपली वचनबध्दता दर्शविली आहे.हा क्रमांक सहज उपलब्ध व्हावा,यासाठी अनेक बसेसवर जांभळ्या रंगांच्या फलकांसह हा क्रमांक दिसेल.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रगत स्टेनलेस स्टील आणि विशेष मिश्र धातूंमधील उच्च – मुल्यवर्धित उत्पादनांची आघाडीची कंपनी अलिमा इंडिया सर्व दामिनी अधिकारी,22 पोलिस स्टेशन आणि संपूर्ण महाराष्ट्रात 13500 पत्रके,माहिती कार्डस वितरित करत आहेत.
होप फॉर द चिल्ड्रन फाऊंडेशनच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरोलीन आऊडॉईर डे वॉल्टर म्हणाल्या की, भारतात महिला व मुलांसोबत काम केल्यानंतर त्यांची असुरक्षितता हे चिंतेचे कारण आहे.अलीकडील घटनांमुळे महिलांच्या सुरक्षाबद्दल आणखी चिंता निर्माण झाली आहे.म्हणूनच या महत्त्वाच्या मुद्दयावर आमच्यासोबत भागीदारी केल्याबद्दल मी अलिमा कंपनीची खूप आभारी आहे.महिला सुरक्षेवर लक्ष केंद्रित करणारा हा पायलट कार्यक्रम आम्ही एकत्रितपणे सुरू केला असून यावर्षी याचा विस्तार आम्ही करत आहोत.जेव्हा महिला सुरक्षित असतात तेव्हा त्या पुढच्या पिढीला पूर्णपणे सक्षम बनवू शकतात.सर्वांसाठी एक उज्वल आणि सुरक्षित भविष्य निर्माण करू शकतात.
अलिमाच्या बिझनेस युनिट ट्युब एपीएसी चे प्रमुख शरथ सतीश म्हणाले की,महिलांसाठी सुरक्षित सार्वजनिक जागा सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.गेल्या वर्षी आम्ही प्रशिक्षण आणि पाठिंब्याद्वारे पोलिसांबरोबर संवाद सुधारण्यासाठी प्रमुख भागीदारांसह दामिनी सखी उपक्रम सुरू केला.आज आम्ही सखी सुरक्षा अंतर्गत पहिल्या पीसीएमसी बसला हिरवा झेंडा दाखवून आणखी एक पाऊल उचलले आहे,ज्यामुळे महिलांना प्रवास करताना इर्मजन्सी हेल्पलाईन नंबर सहजरित्या उपलब्ध होईल.अशा प्रकारची छोटी पावले सुरक्षित वातावरण निर्माण करू शकतात.सुरक्षित सार्वजनिक जागा निर्माण करण्याची आमची वचनबध्दता कायम आहे.
दामिनी सखी कार्यक्रमाचे वैशिष्टय
प्रतिबंध,प्रशिक्षण आणि जागरूकता या तीन मुख्य स्तंभांवर दामिनी कार्यक्रम आधारित आहे.याची अंमलबजावणी डिस्ट्रीक्ट लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी (डीएलएसए) च्या सचिव सोनल पाटील यांच्या नेतृत्वाखाली व महिला सुरक्षेसाठी वचनबध्द असलेल्या प्रमुख भागधारकांच्या सहकार्याने राबवला जात आहे.
–पिंपरी चिंचवड आयुक्तालय
-होप फॉर द चिल्ड्रन फाऊंडेशन (एचएससीएफ)
-अलिमा इंडिया यांच्या सहकार्याने
-राज्य महिला आयोग
-महिला आणि बालविकास विभाग
-पोलिस संशोधन केंद्र
या कार्यक्रमात महिलांना व्यावहारिक कौशल्य आणि ज्ञान प्रदान करण्यासाठी स्व-संरक्षण वर्ग जागरूकता सत्रे आणि विशेष प्रशिक्षण यांचा समावेश आहे.\
दामिनी सखी कार्यक्रमाचा प्रभाव
-सुरू झाल्यापासून दामिनी सखी कार्यक्रमाने प्रतिबंध,संरक्षण,क्षमता निर्मिती आणि निवारण प्रयत्नांमध्ये महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत.
-715 महिलांना स्व सरंक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.ज्यामुळे त्यांना संकटांना तोंड देण्यासाठी आवश्यक कौशल्य मिळाले.
-महिलांचे हक्क व सुरक्षिततेवरील सामुदायिक जागरूकता सत्रांमध्ये 1570 व्यक्तींनी भाग घेतला.
-आळंदी यात्रा कार्यक्रमात पर्पल रिबन मोहिमेद्वारे अप्रत्यक्षपणे 3 ते 4 लाख लोकांपर्यंत पोहचता आले.
-प्रतिसाद यंत्रणा सुधारण्यासाठी महिला सुरक्षेच्या मुद्दयांवर 365 कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
-जागरूकता निर्माण करण्यासाठी 13500 आयईसी (इन्फॉर्मेशन,एज्युकेशन ॲन्ड कम्युनिकेशन) साहित्याचे वाटप करण्यात आले.
ही नवीन बस जाहिरात मोहिम पुणे शहरातील महिला सुरक्षेचा एका मोठ्या उपक्रमाचा भाग आहे.प्रतिबंध,प्रशिक्षण आणि जागरूकता या तीन स्तंभांवर आधारित हा कार्यक्रम आहे.दामिनी सखी या व्यापक कार्यक्रमाचा हा एक भाग आहे. हा उपक्रम ऑक्टोबर 2024 मध्ये होप फॉर द चिल्ड्रन फाऊंडेशन (एचएफसीएफ),स्थानिक प्रशासन आणि सरकारी भागधारकांच्या सहकार्याने सुरू करण्यात आला होता.महिला सुरक्षा सुधारण्यासाठी सीएसआर उपक्रमाचा भाग म्हणून पीसीएमसी परिसरात 25 हाय रिझोल्यूशन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे बसविले जात आहे.याचा निर्णय गुन्हेगारीच्या ठिकाणांचे विश्लेषण करून दापोडी पोलिस स्टेशनच्या सहकार्याने घेण्यात आला.ही सर्व्हेलन्स यंत्रणा पोलिस निरीक्षक,उपनिरीक्षक व डिटेक्टिव्ह शाखेतर्फे नियंत्रित केली जाते,ज्यामुळे घटनांना जलद प्रतिसाद मिळतो आणि एकूण सुरक्षितता सुधारते.या उपक्रमांतर्गत सार्वजनिक ठिकाणी सक्रियपणे गस्त घालणाऱ्या,महिलांना त्वरित मदत करणाऱ्या आणि प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणाऱ्या पुणे पोलिस अंतर्गत असलेल्या समर्पित दामिनी पथक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते.
डिस्ट्रीक्ट लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी (डीएलएसए) च्या सचिव सोनल पाटील म्हणाल्या की,महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी मोहिमा राबविणे ही काळाची गरज आहे.पिंपरी चिंचवड पोलिस,सेंटर फॉर पोलिस रिसर्च,महिला आणि बालविकास विभाग,होप फॉर द चिल्ड्रन फाऊंडेशन आणि अलिमा इंडिया प्रा.लि.यांच्या सहकार्याने महिला सुरक्षा व जागरूकता वाढवण्यासाठी घेतलेल्या पुढकारासाठी मी मनापासून कौतुक करते.समाजात जागरूकता निर्माण करणे,भागधारकांना प्रशिक्षण देणे आणि डिजिटल मोबाईल,वाहने,पीएमपीएल बसेस,व्हीडिओज,बुकलेटस व लिफलेटसद्वारे माहिती देणे या मोहिमेचे प्रमुख वैशिष्टय आहे.महिलांचे संरक्षण आणि त्यांच्या हक्कांबाबत समाजामध्ये माहिती देणे ही आपली सामुहिक जबाबदारी आहे.महिलांना सक्षम बनविण्यात आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात असे उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावतात.या मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व संस्था व व्यक्तींचे मी मनापासून अभिनंदन करते आणि सर्वांना सुरक्षित आणि अधिक सक्षम समाजासाठी या मोहिमेत सहभागी होण्याचे सर्वांना आवाहन करते.
अलिमा कंपनीच्या बिझनेस युनिट ट्युब एपीएसीच्या विपणन व्यवस्थापक व कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी अधिकारी साईप्रिया परांजपे म्हणाल्या,बस मोहिमेचे उद्दिष्ट सार्वजनिक वाहतूकीवर हेल्पलाईन क्रमांक अधिक स्पष्ट आणि दृश्यमान करून जागरूकता निर्माण करणे आणि या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे हे आहे.कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याचा भाग म्हणून आम्ही तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करून मूल्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत,ज्यामुळे मदत मिळणे अधिक जलद व सोपे होईल.पोलिसांसोबत काम करून आम्ही केवळ देखरेख वाढवत नाही तर,कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था व समुदायामध्ये विश्वास अधिक दृढ करत आहोत.महिला निर्भयपणे जगू शकतील अशा भविष्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करत आहोत.