पुणे :राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री मा.ना.श्री.जयकुमार रावल यांनी बैठक घेऊन राज्यातील आंबा उत्पादकांना थेट विक्री करता यावी यासाठी राज्यात विविध भागात आंबा महोत्सवांचे आयोजन करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत.

आंबा विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थ वगळून शेतक-यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा आंबा मिळावा या उद्देशाने उत्पादक ते थेट ग्राहक संकल्पनेनुसार महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी पणन मंडळाच्या आंबा महोत्सवाचे सलग 24 वे वर्ष आहे.

चालूवर्षी दि.1 एप्रिल ते 31 मे 2025 या कालावधीतआंबा महोत्सव-2025’ चे आयोजन महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे व पुणे जिल्हा परिषद, पुणे यांचे सहकार्याने मार्केटयार्ड येथे तसेच गांधी भवन-कोथरूड, मगरपट्टा-हडपसर आणि खराडी या चार ठिकाणी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या कोकणातील पाच जिल्ह्यातील भोगोलिक मानांकन (Geographical Indication-GI) मिळालेला हापूस आंबा तसेच राज्यातील केशर, पायरी तसेच इतर वाणांचा आंबा उपलब्ध होणार आहे. 

कोकणातल्या हापूसच्या नावावर परराज्यातून आलेल्या आंब्याची सर्रास विक्री होते. त्यामुळे कोकणच्या हापूसचं नाव बदनाम होत आहे. पण आता जीआय मानांकनामुळे हापूसच्या नावे होणारी फसवणूक टाळली जाणार आहे. ही बाब विचारात घेऊन, कृषि पणन मंडळामार्फत आयोजित आंबा महोत्सवातदेखील जीआय मानांकन प्राप्त झालेल्या शेतक-यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक श्री.संजय कदम यांनी सांगितले. या महोत्सवामध्ये मार्केटयार्ड येथे 60 स्टॉल तसेच गांधी भवन-कोथरूड, मगरपट्टा-हडपसर आणि खराडी या ठिकाणी प्रत्येकी 20 असे एकूण 120 स्टॉल्सद्वारे आंब्याची विक्री व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे शहराच्या विविध भागातील ग्राहकांची सोय होणार आहे.

सदर महोत्सव 31 मे पर्यंत चालू असणार आहे. तरी कोकणातील उच्च प्रतिच्या हापूस आंब्याचा तसेच राज्याच्या विविध भागातील केशर आंब्याचा लाभ ग्राहकांनी अवश्य घ्यावा असे आवाहन पणन मंडळाचे सरव्यवस्थापक श्री. विनायक कोकरे यांनी केले.