पुण्यात प्रथमच होणार गौ-कथा सप्ताह श्री देशमुख महाराज फाऊंडेशनच्यावतीने प.पू. श्री गंगाधर स्वामी यांच्या १९ व्या समाधी सोहळ्यानिमित्त सप्ताहाचे आयोजन : देशी गायींच्या प्रजातींबाबत जनजागृतीचा उपक्रम

पुणे : श्री देशमुख महाराज फाऊंडेशनच्या वतीने प.पू. श्री गंगाधर स्वामी यांच्या १९ व्या समाधी सोहळ्यानिमित्त देशी गायींच्या प्रजातींबाबत जनजागृती करण्यासाठी पुण्यात प्रथमच गौ-कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा गुरुवार, दिनांक ८ जानेवारी ते बुधवार, दिनांक १४ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. वर्धमान सभागृह, गंगाधाम चौक येथे या कथेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णा बालेघाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला संस्थापक अध्यक्ष गुरुदास देशमुख महाराज, विश्वस्त नरहर शिदोरे, वेदमुर्ती मंदार खळदकर, भोला वांजळे, प्रसाद खंडागळे, निरंजन गोळे, विरेंद्र कुंटे,अमित भुतडा आदी उपस्थित होते.

श्री देशमुख महाराज फाऊंडेशन व विश्व हिंदू परिषद, दुर्गा शक्ती, मातृ शक्ती, गौ भक्त ग्रुप, गौ भगिनी कन्या ग्रुप, ग्रंथ दिंडी पारायण ग्रुप, गो विज्ञान परिषद या सहयोगी संस्था यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गौ-कथा सप्ताहाचे उद्घाटन गुरुवार, दिनांक ८ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजता होणार आहे. कथा सप्ताहात पू. साध्वी कपिला दिदी गोपाल सरस्वती या उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

गुरुवार, दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी उद्घाटनानंतर कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी २.३० वाजता देशी गायींविषयी भारतीय कामधेनू या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. सप्ताहाचा समारोप पालखी सोहळ्याने होणार असून बुधवार, दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी *प.पू. गंगाधर स्वामी यांच्या संजीवन पादुका पालखी सोहळ्याचे आयोजन पानशेत येथील गिवशी गावातील साधनाश्रम* येथे करण्यात आले आहे.

या सप्ताहात गौसेवा करणा-या संस्था व गोरक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच देशी गायींच्या विविध प्रजातींचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून त्याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. कार्यक्रमादरम्यान भक्तांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून *नागरिकांनी व युवकांनी* मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.