वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेतर्फे आयोजन ; सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांची उपस्थिती महाराष्ट्रातील १२ वैद्यांचा होणार पुरस्काराने गौरव
पुणे : आयुर्वेद, वनस्पती शास्त्र, रसशास्त्र, चिकित्सा अशा विविध आयामांमध्ये कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या वैद्यांना वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेतर्फे वैद्यकीय पुरस्काराने दरवर्षी गौरविण्यात येते. यंदाचा महर्षि अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार मुंबईचे वैद्य नरेंद्र भट्ट यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच या मुख्य पुरस्कारासह आयुर्वेदाच्या विविध आयामांमध्ये कार्यरत अशा महाराष्ट्रातील १२ वैद्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्य विनायक परशुराम वैद्य खडीवाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला संगीता विनायक वैद्य खडीवाले उपस्थित होते.
गुरुवार, दि. १५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता टिळक स्मारक मंदिर येथे होणा-या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले उपस्थित राहणार आहेत. मुख्य पुरस्काराचे स्वरुप ५१ हजार १ रुपये, मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याचे यंदा ४१ वे वर्ष असून उल्लेखनीय कार्य करणा-या या वैद्यांची माहिती देणा-या स्मरणिकेचे प्रकाशन देखील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते होईल.
मुख्य पुरस्कारासह वैद्य पुरुषोत्तम शास्त्री नानल चरक पुरस्कार मुंबईचे वैद्य एच.बी.सिंग, वैद्य द.वा. शेंड्ये रसौषधी पुरस्कार नाशिकचे वैद्य संजय खेडेकर, वैद्य वि.म.गोगटे वनौषधी पुरस्कार पुण्याच्या वैद्या मिनल लाड, वैद्य आचार्य यादवजी त्रिकमजी ग्रंथ पुरस्कार मुंबईचे वैद्य अंकुश जाधव, वैद्य बाळशास्त्री लावगनकर पंचकर्म पुरस्कार जालन्याचे वैद्य प्रवीण बनमेरु, वैद्य बापूराव पटवर्धन सुश्रुत पुरस्कार पुण्याचे वैद्य चंद्रकुमार देशमुख, वैद्य भा.गो. घाणेकर अध्यापन पुरस्कार पुण्याचे वैद्य उमेश टेकवडे, वैद्य मा.वा.कोल्हटकर संशोधन पुरस्कार मुंबईच्या वैद्या स्वप्ना कुलकर्णी, वैद्या लक्ष्मीबाई बोरवणकर स्त्री वैद्या पुरस्कार पुण्याच्या वैद्या रेणुका कुलकर्णी, वैद्य शंकर दाजीशास्त्री पदे कार्यकर्ता पुरस्कार पुण्याचे वैद्य गणेश परदेशी, पूज्य पादाचार्य रचनात्मक कार्य पुरस्कार पेणचे वैद्या शिल्पा ठाकूर आणि डॉ.वा.द.वर्तक वनमित्र पुरस्कार डोंबिवलीचे दीपक जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. या सर्व पुरस्कारांचे स्वरुप २१ हजार १ रुपये, प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व श्रीफळ असे आहे.
आयुर्वेदात पंचकर्म, शल्यतंत्र, संशोधन, समाजसेवा, अध्ययन अशा विविध क्षेत्रात मोलाचे कार्य करणा-या वैद्यांचा यशोचित सन्मान यानिमित्ताने केला जाणार आहे. पुरस्कार समितीच्या कार्यात वैद्य एकनाथ कुलकर्णी, वैद्या मीरा औरंगाबादकर, वैद्य विनय वेलणकर, वैद्य शिवानंद तोंडे, समितीचे अध्यक्ष वैद्य स.प्र.सरदेशमुख, सचिव वैद्य योगेश वसंत गोडबोले तसेच वैद्य खडीवाले वैद्य संशोधन संस्थेचे विश्वस्त वैद्य विनायक वैद्य खडीवाले, संगीता विनायक वैद्य खडीवाले, वैद्य विवेक साने, वैद्य निखिल विनायक वैद्य खडीवाले, जयश्री टाव्हरे, वैद्य अनंत निमकर यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
