सोलापूर  :एच. व्ही देसाई आय हॉस्पिटल, पुणे चा प्रकल्प असलेल्या सोलापूर येथील शंकरशेठ साबळे नेत्ररुग्णालय, बाळे येथे भारताच्या अंध महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार श्रीमती गंगा कदम यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
या सत्कार समारंभाला रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा मेहता, मुख्य प्रशासकीय अधिकारी सुधीर सुधाळ आणि मुख्य कामकाज अधिकारी डॉ.सुशीला कवाडे, तसेच प्रशिक्षक श्री. अनिल सामराणी हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस नर्सिंग प्रमुख अमलदास घोडके यांनी रुग्णालयाच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, रुग्णालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंत २००० पेक्षा अधिक यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ग्रामीण व शहरी भागात जाऊन नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया व नेत्र उपचार अत्यंत माफक दरात किंवा अनेक वेळा मोफत उपलब्ध करून देण्याचा रुग्णालयाचा प्रयत्न आहे. प्रत्येक रुग्णाला शहरात आणून दर्जेदार उपचार, अन्न व आवश्यक सोयी दिल्या जातात आणि शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांच्या गावी सुरक्षितपणे पाठवण्यात येते, असे त्यांनी नमूद केले.
यानंतर डॉ.सुशीला कवाडे यांच्या हस्ते गंगा कदम व श्री. अनिल सामराणी यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात डॉ.सुशीला कवाडे म्हणाल्या, “सातत्यपूर्ण प्रयत्न आणि मेहनत यशाकडे घेऊन जात असते.” दृष्टीदोष असूनही गंगा कदम यांनी संघासाठी व स्वतःच्या आयुष्यासाठी घेतलेले परिश्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रुग्णालयाच्या माध्यमातून अनेकांच्या आयुष्यात पुन्हा स्पष्ट दृष्टी देण्याचे कार्य सुरू असून, भविष्यात कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी रुग्णालय सदैव त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही दिली.
डॉ. रेश्मा मेहता यांनी आपल्या भाषणात संघभावनेचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “टीम म्हणून काम केल्यासच सर्वोत्तम परिणाम मिळतात आणि त्याचमुळे भारतीय संघ आज यशस्वी ठरतो.”
या प्रेरणादायी सत्कार समारंभाची संकल्पना डॉ. रेश्मा मेहता यांची होती.
यावेळी श्रीमती गंगा कदम यांनी आपली जीवनकहाणी सांगताना हिंगोली जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्म झाल्यापासून ते भैरूरतन दमाणी शाळेत शिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंतचा प्रवास उपस्थितांसमोर उलगडला. त्यांचा संघर्षमय प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. श्रीकांत जाधव यांनी उपस्थित मान्यवर, कर्मचारी, खेळाडू व सर्व सहकार्यांचे आभार मानत आभार प्रदर्शन केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश कासार यांनी केले.