पुणे : महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनच्या (बीएनसीए) संशोधन केंद्र व प्रकाशन विभागातर्फे ‘नॅशनल कॉन्फरन्स ऑन बिल्ट एनव्हायरमेंट अँड बियाँड २.०: थिअरी, प्रॅक्टीस अँड पॅडागोगी’ (बांधकाम पर्यावरण आणि त्या पलीकडील वाटचाल २.०: सिद्धान्त, प्रघात आणि अध्यापनशास्त्र) या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या शोधनिबंधांवरील लेखी अहवालाचे नुकतेच प्रकाशन झाले. त्यामध्ये नागरी क्षेत्राशी संबंधित ४५ शोधनिबंधांचा समावेश आहे. त्यात वास्तूरचना आणि शहर नियोजन, भूदृश्यरचना आणि पर्यावरण, कला आणि मानव्य, पर्यावरण, संस्कृती आणि वारसा संवर्धन, आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवा इत्यादी विषयांवरील शोधनिबंध आहेत.
या अहवालाच्या निमंत्रक डॉ.अवंती बंबावाले या शहर नियोजन तज्ज्ञ असून सहनिमंत्रक प्रा. सिद्धी जोशी, प्रा. मंदार आठवले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या शहर नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील, बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे, बीएनसीएच्या संशोधन केंद्राच्या प्रमूख डॉ. स्वाती सहस्रबुद्धे, तसेच डॉ. आरती वर्मा, डॉ. बंबावाले आणि डॉ. मीरा शिरोळकर यांच्या उपस्थितीत हे प्रकाशन संपन्न झाले. राष्ट्रीय परीषदेचा हा दुसरा अहवाल असून तो बीएनसीएच्या संशोधन केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात आला.
डॉ. कश्यप म्हणाले की, ही परिषद राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बीएनसीएतील संशोधन केंद्रातर्फे आंतरविद्याशाखीय आणि सहयोगी भूमिकेतून आयोजित केली होती. त्यातून निर्माण होणाऱ्या संशोधनात्मक संवादातून संस्थात्मक, व्यावसायिक आणि उद्योगांमधील संशोधन करू इच्छीणारे अभ्यासक आणि प्रस्थापित संशोधकांमध्ये समन्वय साधला गेला. या व्यासपीठातून वास्तूरचनाशास्त्र व पूरक क्षेत्रांमध्ये संशोधनात्मक वृत्ती ही विद्यार्थीवर्ग, शिक्षणतज्ज्ञ आणि व्यावसायिकांमध्ये निर्माण व्हावी हे त्यामागील उद्दीष्ट आहे.
याच शृंखलेतील पुढच्या परिषदेची घोषणा नुकतीच करण्यात आली असून ‘संरचित वातावरण आणि त्यापलिकडे ३.०: आव्हाने आणि संधी’ यावरील परिषद २८ फेब्रुवारी २०२५ आणि १ मार्च २०२५ रोजी होणार आहे.डॉ. वैशाली लाटकर ह्या त्याच्या संयोजक असून डॉ. मीरा शिरोळकर सहसंयोजक, तर प्रा. निशिगंधा साखरदंडे समन्वयक असणार आहेत. यासाठी लागणारा शोधनिबंधाचा गोशवारा पाठवण्याची अंतिम तारीख ५ ऑक्टोबर २०२४ असून इच्छूक संशोधक आणि वास्तूरचनातज्ज्ञांना बीएनसीएच्या संकेतस्थळावर त्याचा तपशील पाहता येईल.