पुण्यातील दिव्य कला मेळ्याला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद दिव्यांग कलाकारांच्या रंगारंग कार्यक्रमांनी दिव्य कला मेळ्याचा समारोप

पुणे : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागातर्फे आयोजित दिव्य कला मेळ्याचा समारोप कार्यक्रम रविवारी मोठ्या थाटात पार पडला.

या प्रसंगी आयोजित कार्यक्रमास पिंपरी-चिंचवडच्या माजी महापौर उषा ढोरे यांच्यासह दिव्यांगजन आयुक्त प्रदीप पुरी, सहाय्यक आयुक्त, सुधाकर हिंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या मेळ्याचे उद्घाटन शनिवार 28 सप्टेंबर रोजी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते पुण्यातील नवी सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर झाले होते. त्यानंतर रविवार दिनांक 6 ऑक्टोबरपर्यंत एकूण 9 दिवस या मेळ्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अखेरीस, नवव्या दिवशी ‘दिव्य कला शक्ती’ सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मेळ्याचा समारोप करण्यात आला.

दिव्य कला शक्ती कार्यक्रमात पुणे आणि महाराष्ट्रातील 50हून अधिक कलाकारांनी सादरीकरण केले. आजच्या कार्यक्रमात वरील सर्व प्रदेशातील लोक आणि प्रादेशिक नृत्य प्रकारांचा एक अनोखा मिलाफ दिसून आला.

दिव्य कला मेळ्याच्या माध्यमातून गेले 9 दिवस दिव्यांगजनांसाठी एक चांगले व्यासपीठ निर्माण करून देण्यात आले होते. याअंतर्गत दिव्यांगजन सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून त्यांना नोकरीची संधी मिळवून देणे, दिव्यांगांसाठी विविध प्रकारची शिबीरे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले.

या दिव्य कला मेळ्याला सर्वसामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी, विविध स्वयंसेवी संस्था, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक, विद्यापीठांचे विद्यार्थी आदींनी भेट देत दिव्यांगजनांचे सादरीकरण उत्सुकतेने पाहिले. नागरिकांच्या जोरदार प्रतिसादामुळे मेळ्यात लावण्यात आलेल्या विविध स्टॉलमधून 64 लाख रुपयांचे व्यवहार झाले, अशी माहिती आयोजकांनी दिली.