डब्ल्यूपीयूत ” विश्वमानव रत्न रतन टाटा हॉल ऑफ फेम ” च्या निर्मितीचा संकल्प

पुणे :  एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे व माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणेतर्फे मानवतेचा अद्वितीय विनम्र सेवक व टाटा समूहाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड, माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश बी. जोशी, डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, आचार्य प्रा. रतनलाल सोनग्रा, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर. एम.चिटणीस व कुलसचिव गणेश पोकळे उपस्थित होते.
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” मानवतेचा अद्वितीय विनम्र सेवक पद्मविभूषण रतन टाटा यांच्या नावे एमआयटी डब्ल्यूपीयूत विश्वमानव रत्न रतन टाटा हॉल ऑफ फेमची लवकरच निर्मिती करू. रतन टाटा हे नावाप्रमाणेच देशाचे रत्न होते. सचोटी, प्रामाणिकपणा, धडाडी, त्याग, स्नेह, समर्पण, सेवाभाव आणि साधेपणा शिकला पाहिजे. समाजाच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी घालविले. त्यांचा आदर्श व त्यांचे विचार आचरणात आणून कार्य केल्यास त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल.”
प्रा.प्रकाश बी. जोशी म्हणाले, “भारतीय लोक विदेशात जाऊन सर्वोत्कृष्ट व्यवसाय करू शकतात याचे मूर्तीमंत उदाहरण रतन टाटा आहेत. त्यांनी झोराष्ट्रीयन शास्त्रात नमूद केल्यानुसार यश मिळण्यासाठी नीतीमूल्ये सोडायची गरज नाही या तत्वाचे पालन केले होते.”
राहुल कराड म्हणाले, टाटांच्या पिढीने देशासाठी बलिदान दिले आहे. शिक्षण क्षेत्रातील क्रांती मध्ये त्यांचा आमुलाग्र वाटा असून एमआयटीला अभिमान आहे की आमच्या विद्यार्थ्याने  नॅनो कार बनविण्यात महत्वाची भूमिका पार पाडली.
रतन टाटा यांच्यावर महात्मा गांधीजी यांचा प्रभाव होता. त्यांनी विश्वस्ताची भूमिका स्विकारून सामाजिक समतोल साधण्याचे  महत्वाचे कार्य केले आहे. अशी भावना ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे यांनी व्यक्त केले.
तसेच ते एक उद्योगपती बरोबरच उत्कृष्ट वचनबद्ध राष्ट्रप्रेमी, परोपकारी, व्यावहारीक आणि अत्यंत नम्र आत्मा जे जगभरातील लाखों लोकांसाठी एक प्रेरणा आणि रोल मॉडेल होते. अशी भावना डॉ. आर.एम.चिटणीस, डॉ. संजय उपाध्ये, डॉ. एस.एन.पठाण, प्रा. रतनलाल सोनग्रा, डॉ. दत्ता दंडगे आणि नलावडे महाराज यांनी व्यक्त केल्या.
माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहतील विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक व कर्मचारी यांनी यावेळी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.