पुणे : श्रीराम समूहाचा भाग असलेली श्रीराम ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड येत्या 4 नोव्हेंबर 2024 ला गुंतवणूकदारांसाठी श्रीराम लिक्विड फंड या नवीन योजनेचा शुभारंभ करत आहे. कर्ज आणि मुद्रा बाजारातील विविध साधनांमध्ये हा फंड प्रामुख्याने गुंतवणूक करणार आहे. कमी ते मध्यम पातळीची जोखीम स्वीकारत उच्च तरलता राखत गुंतवणूकदारांना अधिक परतावा मि‌ळवून देणे, हे या फंडाचे उद्दिष्ट आहे. सरासरी 91 दिवसांपर्यंतची परिपक्वता असलेल्या वित्तीय साधनांमध्येच हा फंड गुंतवणूक करणार आहे.नवीन फंडाची ऑफर (एनएफओ) येत्या 8 नोव्हेंबर 2024 रोजी बंद होणार आहे.

गुंतवणुकीबाबत फंडाचा दृष्टिकोन

ए वन प्लस दर्जा असलेल्या वित्तीय साधनांमध्येच हा फंड गुंतवणूक करणार आहे. गुंतवणुकीबाबत पद्धतशीर दृष्टिकोन अवलंबताना योजनेच्या परताव्याबाबत इष्टतम समतोल साध्य करताना स्थिरता आणि तरलतेला प्राधान्य देण्याचे उद्दिष्ट फंडाने ठेवलेले आहे. यासाठी हा फंड विविध क्षेत्रांत गुंतवणुक करणार आहे. स्थिर दर्जाच्या दृष्टीकोनासह ऐतिहासिकदृष्ट्या सर्वोच्च दर्जा लाभलेल्या मुदतपत्रांतील गुंतवणूकीस प्राधान्य देत गुंतवणूकीत विविधता साधली जाणार आहे. ठेव प्रमाणपत्रे, कमर्शियल पेपर्स, टी-बिल, जी-सेक आणि चलन बाजार एनसीडी यासारख्या रोखे विषयक सिक्युरिटीजमधील योग्य संतुलनामुळे सुरक्षितता मिळताना अस्थिरताही अल्प राहणार आहे. संशोधनावर आधारलेल्या प्रक्रियेतून पोर्टफोलिओ साकारला जाणार आहे. त्यामध्ये कर्ज मूल्यमापन आणि कर्ज प्रवाहाबाबत सखोल दृष्टिकोन ठेवत व्याजदराच्या चक्राचा अतिशय बारकाईने विचार केला जाणार आहे.श्रीराम ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे एमडी आणि सीईओ कार्तिक एल. जैन म्हणाले, “गुंतवणूकदारांसाठी आर्थिक लवचिकता वाढवणारे पर्याय सादर करण्याच्या आमच्या ध्येयाशी श्रीराम लिक्विड फंड संरेखित आहे. फंडाचा मूल्य प्रस्ताव SLR दृष्टिकोनावर आधारित असून तो स्थिरता, तरलता आणि परतावा संभाव्यता यांचे संतुलन साधतो. त्यामुळे तो रिटेल आणि कॉर्पोरेट गुंतवणूकदारांसाठी एक आदर्श पर्याय आहे. ही योजना कमी अस्थिरतेसह तरलता प्रदान करत असल्याने बचत खात्यात विनावापर शिल्लक असलेल्या पैशावर अधिक परतावा मिळवून देण्यास हा फंड रिटेल गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त आहे. त्याचबरोबर कॉर्पोरेट्स जगताला त्यांच्या रोख व्यवस्थापनासाठीसुध्दा उपयुक्त ठरू शकतो. आपला आकस्मिक निधी अतिशय सुरक्षितपणे आणि कार्यक्षमतेने हाताळण्याची इच्छा असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा एक आदर्श पर्याय आहे. या नवीन गुंतवणूक पर्यायासह, आम्ही आमच्या ग्राहकांच्या विकसनशील गरजा पूर्ण करण्यासाठी आमचा पोर्टफोलिओ वाढवत आहोत.”

श्रीराम एएमसीचे निधी व्यवस्थापक सुदीप मोरे म्हणाले,“श्रीराम लिक्विड फंड हा अल्प-मुदतीसाठी उत्पन्न हवे असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी तयार करण्यात आलेला आहे. त्यात उच्च दर्जाच्या वित्तीय साधनांमध्ये गुंतवणूक करून स्थिरता, तरलता आणि परतावा यांच्यात संतुलन साधले जाणार आहे. सीडी आणि सीपीमध्ये 75 टक्के ते 80 टक्के गुंतवणुक करत हा फंड स्थिर पोर्टफोलिओ वाटप आणि जमा धोरण अवलंबिणार आहे. ओव्हरनाईट पेपर्समध्ये 5% , ठेवी प्रमाणपत्रांमध्ये 25% , व्यावसायिक प्रमाणपत्रांमध्ये 50% आणि टेझरी-बिलांमध्ये 20% अशा आदर्श प्रमाणात फंडातील निधी गुंतविला जाणार आहे. योजनेच्या माहिती दस्तऐवजात नमूद केलेल्या मालमत्ता वाटप पद्धतीनुसार ही गुंतवणूक केली जाणार आहे. वेगवेगळ्या परिस्थितीनुसार गुंतवणूकीचे प्रमाण बदलू शकते. उच्च-गुणवत्तेचे कर्ज आणि चलन बाजारातील (मनी मार्केट) वित्तीय पर्यायांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तसेच व्याज दर आणि कर्ज जोखीम कमी करताना अल्प अस्थिरतेसह सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचे आमचे ध्येय आहे.”