पुणे: जनसेवा सहकारी बँक लि.,हडपसर, पुणे च्या वर्धापनदिन समारंभाच्या निमित्ताने प्रदान करण्यात येणारा ‘ जनसेवा पुरस्कार यंदाचा “जनसेवा पुरस्कार 2024” पुण्यातील वंचित समाजाच्या आरोग्यासाठी आणि सक्षमतेसाठी झटणाऱ्या “निरामय, सिंहगड रोड, पुणे” या संस्थेस प्रदान केला जाणार आहे. हा समारंभ ’ गुरुवार दि.24.10.2024 रोजी संध्याकाळी 5.00 वाजता महात्मा ज्योतीराव फुले सांस्कृतिक भवन वानवडी येथे होणार आहे . पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रु. 1,01,000/- सन्मान चिन्ह, मानपत्र, श्रीफळ, शाल अशा प्रकारचे आहे. सदर कार्यक्रमास पुणे शहरातील लोकप्रतिनिधी व अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे, ही माहिती पत्रकार परिषदेत जनसेवा सहकारी बँक लि.,चे संचालक विनायक गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष पोळेकर, अध्यक्ष राजेंद्र हिरेमठ, संचालक राजेंद्र वालेकर आणि संचालक राजन वडके यांनी दिली.
‘ जनसेवा पुरस्कार ’ प्रदान करण्यास बँकेने दि.24 ऑक्टोबर 1998 पासून सुरुवात केली आहे.
सन 2019 चा “ जनसेवा पुरस्कार ’’ गरजू आर्थिक, दुर्बल रुग्णांना अत्यल्प दरात उच्चतम वैद्यकीय मदत करणाऱ्या “नाना पालकर स्मृती समिती ” या संस्थेस देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रु. 1,01,000/- सन्मान चिन्ह, मानपत्र, श्रीफळ, शाल अशा प्रकारचे होते .
सन 2020 चा “ जनसेवा पुरस्कार ’’ “अस्तित्व प्रतिष्ठान ”, वीर, ता. पुरंदर या संस्थेस देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रु. 1,01,000/- सन्मान चिन्ह, मानपत्र, श्रीफळ, शाल अशा प्रकारचे होते.
सन 2021 चा “ जनसेवा पुरस्कार ’’ – “ तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास”, वेल्हे या संस्थेस देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रु. 1,01,000/- सन्मान चिन्ह, मानपत्र, श्रीफळ, शाल अशा प्रकारचे होते.
सन 2022 चा “ जनसेवा पुरस्कार ’’ – “ पूर्णम इको व्हिजन फाऊंडेशन , पुणे” आणि “वनप्रस्थ फाऊंडेशन, सिन्नर” या संस्थेस देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम प्रत्येकी रु. 51,000/- सन्मान चिन्ह, मानपत्र, श्रीफळ, शाल अशा प्रकारचे होते.
सभासद व असंख्य ग्राहक यांच्या विश्वासाच्या पाठींब्यावर आणि बँकेतील सेवकांच्या परिश्रमाच्याजोरावर बँक गेली 52 वर्षे प्रगती करू शकली असून यापुढेही आपणा सर्वांचे असेच सहकार्य लाभेल असा आम्हाला विश्वास आहे.
*बँक स्थापनेची पार्श्वभूमी*
हडपसरसारख्या तत्कालीन ग्रामीण भागातील समविचारी कार्यकर्त्यांनी (कै.मामासाहेब हजारे, कै. आबनावे गुरुजी, श्री. रघुनाथ कचरे, श्री. मधुकरराव टेमगिरे, कै. रामचंद्र मारुती रासकर) यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन सुरवातीस भिशी मंडळ स्थापन केले. त्याचा व्यवहार वाढत चालल्याचे लक्षात आल्यानंतर आपली स्वतंत्र बँक असावी असा विचार पुढे आला आणि त्यातूनच 1972 साली जनसेवा सहकारी बँक,हडपसर,पुणे ची स्थापना करण्यात आली. बँकेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ता उभा करणे, ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक सहाय्य असा प्रमुख हेतू होता. बँकेच्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीच्या संचालकांनी समाजातील सर्व घटकांना आर्थिक सहाय्य करून चांगला फायदा मिळवून दिल्यामुळे बँक अल्पावधीतच लोकप्रिय झाली आणि “ बहुत जनांसी आधारू” अशी बँकेची प्रतिमा तयार झाली.
* ५2 वर्षाच्या प्रगतीचा आलेख *
बँकेच्या सर्व सभासद, ग्राहक, हितचिंतक यांनी बँकेच्या स्थापनेपासून दाखविलेल्या विश्वासामुळे आणि पाठिंब्यामुळे बँक आत्तापर्यंत प्रगती करू शकलेली आहे. कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेला 52 वर्ष पूर्ण होणे म्हणजे स्थिरता, सक्षमता, परिपक्वता व व्यापक दृष्टीकोन यादृष्टीने पहिले जाते. यापुढेही असाच विश्वास आणि पाठींबा हा बँकेस प्राप्त होईल अशी खात्री आहे.
जनसेवा सहकारी बँक लि.,हडपसर, पुणे हि बँक एक अग्रगण्य सहकारी बँक असुन गेली अनेक वर्षे पुणे जिल्ह्यात नॉन शेडूयल बँकांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. दि.31.03.2024 अखेर रु.1936.69 कोटी ठेवी आणि रु.996.5 कोटींची कर्जे असुन बँकेचा एकूण व्यवसाय रु.2933.19 कोटींचा आहे. सध्या बँकेच्या एकूण 30 शाखा असुन त्यापैकी पुणे व पिंपरी चिंचवड शहर येथे 21, पुणे जिल्ह्यात 03, सातारा जिल्ह्यात 03, नवी मुंबईमध्ये ठाणे व वाशी मिळून 2, आणि नाशिक येथे 1 असा शाखाविस्तार आहे. बँकेची स्वतःची 27 ATM असून Rupay Card द्वारे बँकेच्या ग्राहकांना अन्य बँकांच्या जवळपास 125000 पेक्षा अधिक ATM द्वारे व्यवहार करता येतात. बँकेने स्वतःचा पॅरा बँकिंग विभाग सुरु केलेला असुन त्यामार्फत विमा व्यवसाय आदि सेवा ग्राहकांना पुरविल्या जातात. सध्याचे युग हे डिजिटल युग असल्यामुळे बँकिंग सेवेमध्ये त्याचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन बँक डिजिटल पद्धतीने अद्ययावत व अधिक सुरक्षित व्यवहाराची सुविधा बँक आपल्या ग्राहकांना देत आहे. जनसेवा बँक ग्राहकांना आर्थिक सेवा चांगल्याप्रकारे देत असून, त्याचबरोबर शैक्षणिक, सामाजिक, आरोग्यविषयक क्षेत्रामध्ये योगदान देत असते.