द कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या (सीआयआय) तर्फे मोशी मधील पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर (पीआयईसीसी) येथे 18 ते 20 ऑक्टोबर 2024 दरम्यान सीआयआय नेक्सजेन मोबिलिटी एक्स्पो 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या एक्स्पोचे हे दुसरे वर्ष असून इंटिग्रेटिंग इंडियन मोबिलिटी ही प्रदर्शनाची यंदाची संकल्पना आहे. या उपक्रमात इंटर्नल कंबशन इंजिन्स (आयसीई) ते इलेक्ट्रिक,हायब्रिड,सीएनजी/एलएनजी व इथेनॉल/बायोफ्युएल पॉवर ट्रेन्स सह वाहन व तंत्रज्ञानातील व्यापक श्रेणी प्रदर्शित करण्यात आली आहेत. यामध्ये ऑटोमोबाईल काँपोनंटस,इलेक्ट्रॉनिक्स आणि सबसिस्टिम्समधील नाविन्यपूर्ण उत्पादने देखील बघायला मिळतील.
या एक्स्पोच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी सीआयआयच्या पश्चिम विभागातील टास्क फोर्स ऑन फ्युचर मोबिलिटीचे अध्यक्ष आणि टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लि.चे अध्यक्ष अरविंद गोयल, सीआयआयच्या पश्चिम विभागातील टाक्स फोर्स ऑन फ्युचर मोबिलिटीचे सहअध्यक्ष आणि भारतातील झेडएफ समुहाचे अध्यक्ष आकाश पास्से, सीआयआय नेक्सजेन मोबिलिटी एक्स्पो 2024 चे सहअध्यक्ष व आरएसबी ग्लोबलचे कार्यकारी संचालक रजनीकांत बेहरा, जेबीएम ग्रुपचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक निशांत आर्या, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) चे संचालक डॉ.रेगी मथाई, सीआयआय पश्चिम विभाग 2024-25 चे उपाध्यक्ष आणि बीजी एलआय – इन इलेक्ट्रिकल्स लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ॠषीकुमार बागला, सीआयआय पश्चिम विभाग 2024-25 च्या अध्यक्ष आणि व्ही.एम.साळगावकर ॲन्ड ब्रदर प्रा.लि.च्या अध्यक्ष स्वाती साळगावकर, सीआयआय नेक्सजेन मोबिलिटी एक्स्पो 2024 चे सहअध्यक्ष आणि यझाकी इंडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत नायक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सीआयआयच्या पश्चिम विभागातील टास्क फोर्स ऑन फ्युचर मोबिलिटीचे अध्यक्ष व टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लि.चे अध्यक्ष अरविंद गोयल म्हणाले की, सध्या भारतातील वाहन उद्योग हा सुमारे 80 अब्ज डॉलर्स इतका असून यामध्ये 15 अब्ज डॉलर्स निर्यातीचा समावेश आहे. पुढील काही वर्षांमध्ये हा उद्योग तीन पटीने वाढून 250 अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. वाहन उद्योगाच्या विस्ताराबरोबरच रोजगार संधी देखील वाढणार आहेत.
ते पुढे म्हणाले की, 2070 पर्यंत नेट कार्बन झीरो होण्याचे भारताचे उद्दिष्ट असून यासाठी कंपन्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. अक्षय्य उर्जेची भरपूर उपलब्धता असल्यामुळे ईलेक्ट्रिक व्हेईकलच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाढ होईल. 2047 पर्यंत विकसित देश होण्याचे आपले उद्दिष्ट असताना प्रचंड प्रमाणात संधी उपलब्ध होतील आणि त्यात वाहन उद्योगाचा महत्त्वाचा वाटा असेल.
सीआयआय पश्चिम विभाग 2024-25 च्या अध्यक्ष आणि व्ही.एम.साळगावकर ॲन्ड ब्रदर प्रा.लि.च्या अध्यक्ष स्वाती साळगावकर म्हणाल्या की, गतिशीलता हा आपल्या आर्थिक जीवनाचा कणा आहे,जो लोकांना नोकऱ्या,उद्योग समुदाय आणि अनेक विविध संधींशी जोडतो. शहरी गतिशीलतेमध्ये गर्दी,प्रदूषण सारख्या समस्यांचा सामना करावा लागतो,त्यामुळे भविष्यातील गतिशीलतेमधील विकास शाश्वत आणि एकात्मिक असणे गरजेचे आहे. विद्युत वाहने,शेअर्ड मोबिलिटी यासारख्या नवीन प्रवाहांमुळे जगभरातील शहरांमध्ये परिवर्तन होत आहे. भारत हे एक शहरीकरणाच्या महत्त्वाच्या टप्प्यात असून या सर्व गोष्टींबाबत कृती करण्याची गरज आहे.
त्या पुढे म्हणाल्या की,सीआयआय पश्चिम विभाग नेक्सजेन मोबिलिटी शो च्या माध्यमातून स्वच्छ,कार्यक्षम आणि अभिनव उपायांच्या भविष्याच्या दृष्टीने पुढाकार घेत आहे.
सीआयआय पश्चिम विभाग 2024-25 चे उपाध्यक्ष आणि बीजी एलआय – इन इलेक्ट्रिकल्स लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ॠषीकुमार बागला म्हणाले की, वाहन उद्योगाचा विकास हा अर्थव्यवस्था कशी सुरू आहे याचे एक चांगले सूचक आहे. उत्पादन,कौशल्य विकास,जागतिक मापदंडांनुसार कामकाज आणि मेक इन इंडिया उपक्रमासह सरकारचे समर्थन यामुळे ऑटोमोटिव्ह काँपोनंट उद्योगाने गेल्या दशकात निर्यातीत स्थिर वाढ पाहिली आहे.
ते पुढे म्हणाले की, भारतात वाहन उद्योगाची काही प्रमुख केंद्रे आहेत. भारतातील पश्चिम भाग हे त्यातील सर्वांत महत्त्वाचे आहे.
सीआयआयच्या पश्चिम विभागातील टास्क फोर्स ऑन फ्युचर मोबिलिटीचे सहअध्यक्ष आणि भारतातील झेडएफ समुहाचे अध्यक्ष आकाश पास्से म्हणाले की, भारत हे झपाट्याने वाहन उद्योग केंद्र बनत आहे.सीआयआय मधील आमचा टास्क फोर्स ऑन फ्युचर मोबिलिटी या उद्योगातील आव्हाने आणि संधी याबाबत कार्यरत असून शाश्वत व सर्वसमावेशक विकास होण्यासाठी आम्ही धोरणेल विकसित करत आहोत. वाहन उद्योगात ॲडास सारखे तंत्रज्ञान व अभिनवता अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल.त्यामुळे येत्या काळात अनेक नवीन संधी व नवीन दृष्टीकोन दिसून येईल. जागतिक वाहन उद्योगात भारताला शिखर स्थानी जाण्याची संधी आहे.
सीआयआय नेक्सजेन मोबिलिटी एक्स्पो 2024 चे सहअध्यक्ष व आरएसबी ग्लोबलचे कार्यकारी संचालक रजनीकांत बेहरा म्हणाले की, देशाच्या आर्थिक विकासामध्ये वाहन उद्योगाची एक महत्त्वाची भूमिका आहे. इंटर्नल कंबशन इंजिन्स ते विद्युत वाहनांपर्यंतच्या प्रवासामुळे आपण परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहोत. त्यामुळे सर्व उद्योगाने एकत्र येऊन संवाद साधावा,हे या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश्य आहे.
जेबीएम ग्रुपचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक निशांत आर्या म्हणाले की,जेव्हा मापदंड हे जागतिक असतात,तेव्हा संधी देखील जागतिक असतात. भविष्यातील व्याप्ती व आकार पाहता भारतीय कंपन्या या संधीचा उपयोग करून अनेक पटींनी वाढू शकतात.
ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) चे संचालक डॉ.रेगी मथाई म्हणाले की, आता भारताला आवश्यक असणाऱ्या विशेष गरजांवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे.आमचा भर दोन गोष्टींवर आहे,एक म्हणजे नेट झीरो,दुसरे म्हणजे कार्स आणि दुचाकी व पादचारी यांची सुरक्षितता. एआरएआयमध्ये आम्ही या प्रवासात नियामक आराखडा विकसित करण्याबरोबरच क्षमता विकसित करण्यात देखील मदत करत आहोत. यामुळे परिसंस्थेला अधिक सुरक्षित आणि शाश्वत बनविण्याच्या दिशेने मदत होऊ शकते.
सीआयआय नेक्सजेन मोबिलिटी एक्स्पो 2024 चे सहअध्यक्ष आणि यझाकी इंडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत नायक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.