मिडिया आणि समाजाचे अतूट नाते
माजी सनदी अधिकारी व सांसद टिव्हीचे माजी वरिष्ठ कार्यकारी अधिकारी रवी कपूर यांचे विचारः एमआयटी डब्ल्यूपीयूत‘ सहाव्या राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेचे उद्घाटन’
पुणे : ” मिडिया आणि समाज यांचे अतूट नाते आहे. सामाजिक प्रश्न आणि जनहिताशी जोडूनच पत्रकारिता अर्थपूर्ण बनते. पत्रकारितेच्या तीन स्तरावरील अभ्यासात सर्व प्रथम स्तर गेल्या १०० वर्षातील पत्रकारिता, स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारिता आणि वर्तमान काळातील पत्रकारिता असा अभ्यास करता येतो.” असे विचार माजी सनदी अधिकारी व सांसद टिव्हीचे माजी वरिष्ठ कार्यकारी अधिकारी रवी कपूर यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी च्या स्कूल ऑफ मिडिया अँड कम्युनिकेशन, पुणेतर्फे सहाव्या राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषद, कोथरुड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे आयोजित करण्यात आली. याच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
पुणे युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट, आर. के.लक्ष्मण संग्रहालय आणि नवी दिल्ली फॉरेन करस्पॉन्डंटस क्लब ऑफ साउथ एशिया यांच्या सहयोगाने ही परिषद होत आहे.
यावेळी प्रसिद्ध टेलिव्हिजन निर्माता सिद्धार्थ काक, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुमित भावे, हेरॉल्ड पब्लिकेशनचे समूह प्रमुख सुजय गुप्ता, बुलंद भारत टिव्हीचे मुख्य संपादक राजकिशोर तिवारी, लेखक निल डिसुल्वा आणि अभिनेत्री प्रांजली सिंग परिहार या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे सीओओ डॉ. संजय कामतेकर व स्कूल ऑफ मीडिया कम्युनिकेशनचे सहयोगी अधिष्ठाता धिरज सिंग उपस्थित होते.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली ही परिषद होत आहे.
रवी कपूर म्हणाले,” सर्वात पहिला स्तर म्हणजे गेल्या १०० वर्षामध्ये सृष्टीवरील संपूर्ण समाजाला आणि घटनांना बीबीसी, सीएनबीसी, इकॉनॉमिक्स आणि टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रांनी जोडून ठेवले होते. त्यानंतर देशात स्वातंत्र्यपूर्व काळात म. गांधीजी यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला नियंत्रित केले होते. वर्तमान काळात सोशल मिडियाच्या माध्यमातून संपूर्ण मानव एक दूसर्याशी जुळलेला आहे. आता सरकारवर विचार करण्याची वेळ आली आहे की याला नियंत्रित कसे करावे. त्यातच भविष्य एआयचे आहे. परंतू हे सर्व असतांना सुद्धा कंटेन्ट सर्वात महत्वपूर्ण राहणार आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,”माध्यमांच्या माध्यमातूनच समाजाला दिशा दाखविण्याचे कार्य होत आहे. त्यामुळे पत्रकारितेत तत्वांचे पालन करून योग्य मार्गावर चालावे. आध्यात्माच्या आधारे तत्वनिष्ठ पत्रकारिता करावी. सध्याच्या काळात शिक्षण क्षेत्रात काॅन्शियसनेस ही संकल्पना नवी दिशा देणारी असल्याने माध्यमांनी यावर ही विचार करावा.”
सुमीत भावे म्हणाले,” पत्रकारिता ही समाजातील घटनांना व्यक्त करणारे माध्यम आहे. परंतू वर्तमान काळात वाढत्या सोशल मिडियामुळे समाजाला व्यक्त होता येते परंतू हाच मिडिया देशामध्ये विभाजन आणू पाहतो. एआयचा प्रवेश होत असतांना पत्रकाराने स्वतःला अपडेट करावे.”
” पुणे श्रमिक पत्रकार संघ हा देशातील सर्वात जुनी १९४० ची संघटना असून यामध्ये जवळपास ५०० पेक्षा अधिक पुणे व पिंपरीचे सदस्य असल्याचे त्यांनी नमूद केले.”
राजकिशोर तिवारी म्हणाले,” सतत बातम्यांच्या शोधात असलेले माध्यमे हे शक्तीशाली असून त्यामध्ये अनेक आव्हाने आहेत. ५ डब्ल्यू १ एच या तत्वाचे पालन करून प्रश्न विचारण्याची ताकत तुमच्यात असावी. याशिवाय पत्रकारिता पूर्ण होऊच शकत नाही. एआयच्या जगात मोठ्या प्रमाणात बदल होणार्या माध्यमात आजही कंटेन्टला सर्वाधिक महत्व आहे.”
सिध्दार्थ काक म्हणाले,” समाजाला नवउत्साह देण्याचे काम माध्यमातून होत आहे. पत्रकारिता करतांना निरिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. तसेच ऐकणे व समजणे, प्रश्न विचारणे आणि विचारपूर्वक लिखाण करणे हे खूप गरजेचे आहे.”
मिडिया हा समाजाशी जुळलेला असल्याने कोणताही विषय हाताळतांना त्याच्या मुळापर्यंत जाऊन काम करावे. मिशन, व्हिजन, गोल आणि शोध पत्रकारिता करतांना पत्रकारितेचे तत्व सोडू नये. कोविडच्या काळानंतर या क्षेत्रात प्रचंड बदल आले आहेत. असे विचार सुजय गुप्ता, निल डिसुल्वा व अभिनेत्री प्रांजली सिंग परिहार यांनी व्यक्त केले.
एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी व्हिडीओच्या माध्यमातून संदेश देऊन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर डॉ. संजय कामतेकर यांनी विचार मांडले.
प्रा.धिरज सिंग यांनी स्वागतपर भाषण केले.
डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.