मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात श्री शिवाजी मराठा हायस्कूल तृतीय विभागीय पातळीवर महापालिका खाजगी शाळा गटात तिसरा क्रमांक : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या हस्ते सन्मान
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानाच्या विभागीय पातळीवर महानगरपालिका खाजगी शाळा गटात श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या श्री शिवाजी मराठा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय प्रशालेने तृतीय क्रमांक पटकावला.
यानिमित्ताने प्रशालेच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिवाजी मराठा सोसायटीचे मानद सचिव अण्णा थोरात, उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळ अध्यक्ष सत्येंद्र कांचन, कारभारी मंडळ अध्यक्ष सुरेश देसाई, शाळा समिती अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड आणि सर्व कारभारी मंडळ सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाकडून शाळेला अकरा लाखांचे बक्षीस आणि प्रशस्तीपत्र शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या हस्ते मुंबई येथे देण्यात आले. ‘माझी शाळा सुंदर शाळा अभियान’ प्रशालेमध्ये यशस्वीरित्या राबविण्यासाठी संस्थेचे मानद सचिव अण्णा थोरात आणि पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले. प्रशालेचे प्राचार्य दिलीप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी नियोजनपूर्वक काम केले.
अण्णा थोरात म्हणाले, ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्याप्रमाणे बहुजनांसाठी संस्था आणि शाळा काम करत आहे. शासनाकडून मिळालेल्या रकमेlतून प्रशालेसाठी सोलर पॅनल बसविणे, ई लर्निंग चे वर्ग तयार करणे, संगणक खरेदी करणे, बोलक्या भिंती तयार करणे यांसह प्रशालेच्या रेकॉर्डसाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर घेण्यात येणार आहेत.
प्राचार्य दिलीप काकडे म्हणाले, सन १९९८ पासून तळागाळातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, गणवेश बूट आणि शैक्षणिक शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायमच प्रयत्न केले जातात. शासनाकडून मिळालेल्या बक्षीस रकमेचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.