तृशक्तीमध्ये संस्कारी पिढी निर्माण करण्याची ताकद विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र धर्माचार्य संपर्क विभाग प्रांत सहप्रमुख ह.भ.प. सुप्रिया साठे ; प्रभात जन प्रतिष्ठान तर्फे १५० महिलांसोबत आपुलकीची भाऊबीज ; दिवाळीनिमित्त धान्य व जीवनावश्यक २५ वस्तूंच्या किटची भेट

 

पुणे : कोणतीही गोष्ट घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे, हे आपल्याला व संस्थांना समजले पाहिजे. आज समाजात अनेक संस्था अशा आहेत, ज्या देण्यावर भर देतात, ही आनंदाची बाब आहे. हिंदू धर्मात मातृशक्तीला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे. मातृशक्तीमध्ये संस्कारी पिढी निर्माण करण्याची ताकद असून ती प्रत्येक महिलेने जागृत करायला हवी, असे मत विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र धर्माचार्य संपर्क विभाग प्रांत सहप्रमुख ह.भ.प. सुप्रिया साठे यांनी व्यक्त केले.

प्रभात जन प्रतिष्ठान व प्रभात मित्र मंडळातर्फे महात्मा फुले पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आपुलकीची भाऊबीज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहराच्या पूर्व भागातील १५० गरजू भगिनींना दिवाळीपूर्वीच दिवाळीचे साहित्य व धान्य देण्यात आले. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेवक हेमंत रासने, सम्राट थोरात, विष्णू हरिहर, उद्योजक राहुल येमुल, पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ महिला समिती अध्यक्ष सीमा बंग, प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर चव्हाण, मंगेश शिंदे, उत्सव प्रमुख विजय चौधरी, शिवराज बलकवडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. किटमध्ये २५ प्रकारच्या वस्तू व धान्य तसेच साडीचोळी देण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना महिलांनी औक्षण देखील केले.

सीमा बंग म्हणाल्या, समाजात सर्वत्र पसरलेल्या अंध:कारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त आहेत. गणेशोत्सव मंडळ व प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांसाठी सुरु असलेले काम अत्यंत कौतुकास्पद आहे.

किशोर चव्हाण म्हणाले, दिवाळीचा दिवा प्रत्येक घरात प्रकाशित झाला पाहिजे, या उद्देशाने शहराच्या पूर्व भागातील गरजू महिलांसाठी आगळा-वेगळी भाऊबीज गेल्या १३ वर्षांपासून आम्ही साजरी करतो. कुटुंबातील ४ ते ५ व्यक्तिंसाठी महिनाभर पुरतील इतके साहित्य या किटमध्ये दिले आहे. ही भेट किंवा मदत नसून ओवाळणी आहे. सण-उत्सवाच्या माध्यमातून समाजाच्या गरजू घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मंडळ, प्रतिष्ठान व युवा कार्यकर्ते सतत करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.अमोल थोरात,हेमराज साळुंके,नितीन घोगरे, अजय गंधे, ओमकार नाईक,कुणाल जगताप, अक्षय चौहान ,कृष्णा परदेशी ,मनोज शेलार,गौरव मळेकर आदींनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहभाग घेतला. निलेश कांबळे, रवींद्र भन्साळी यांनी सूत्रसंचालन केले