तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
तडीपार गुंडाने कोयते उगारुन दहशत माजविल्याची घटना मंगळवार पेठेत घडली. याप्रकरणी गुंडासह साथीदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पुणे : तडीपार गुंडाने कोयते उगारुन दहशत माजविल्याची घटना मंगळवार पेठेत घडली. याप्रकरणी गुंडासह साथीदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रतीक विजय माने (वय २३, रा. कुंजीर वस्ती, मांजरी), आकाश ज्ञानेश्वर तानवडे (वय २३, रा. जहाँगीरनगर, मुंढवा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस कर्मचारी चेतन होळकर यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
माने सराइत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी त्याला एप्रिल महिन्यात पुणेशहर, पिंपरी-चिंचवड, तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले होते. तडीपार केल्यानंतर तो शहरात वावरत होता. आदेशाचा भंग करुन तो मंगळवार पेठेतील भीमनगर परिसरात रात्री साडेअकराच्या सुमारास आला. ‘या भागातील आम्ही दादा आहोत. आमच्या नादी लागला तर कोणाला सोडणार नाही’, अशी धमकी देऊन त्याने परिसरात दहशत माजविली. कोयते उगारुन त्याने नागरिकांना धमकावले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक जवळगी तपास करत आहेत.