पुणे : द पूना क्लब गोल्फ कोर्स आणि भारतातील व्यावसायिक गोल्फचे एकमेव अधिकृत नियामक मंडळ टाटा स्टिल प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया (पीजीटीआय) यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते ९ नोव्हेंबर दरम्यान पूना क्लब गोल्फ कोर्स येथे रंगणाऱ्या द पूना क्लब ओपन गोल्फ स्पर्धेची आज घोषणा करण्यात आली. या स्पर्धेमध्ये पुण्यातील आतापर्यंतच्या सर्वोच्च १ कोटी रुपये पारितोषिक रकमेचा समावेश आहे.
या स्पर्धेला यजमान पूना क्लब गोल्फ कोर्स, मुख्य प्रायोजक वेंकीज इंडिया लिमिटेड, व्हेनकॉब आणि एनईसीसी यांचे सहकार्य लाभले आहे. तसेच, विप्रो पारी, पंचशील, शूबान इनव्हेस्टमेंट्स, एलिका आणि ऑटोमेक हे या स्पर्धेचे सहयोगी प्रायोजक आहेत.
पत्रकार परिषदेत पूना क्लब लिमिटेडचे अध्यक्ष गौरव गढोक, उपाध्यक्ष इंद्रनील मुजगुले, पूना क्लब गोल्फ कोर्सचे कॅप्टन जय शिर्के, लेडी कॅप्टन पद्मजा शिर्के, माजी कॅप्टन व गोल्फ सल्लागार इक्रम खान, पीजीटीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम सिंग मुंडी, पुण्याचा ऑलिंपिकपटू उदयन माने, २०२४ वर्षासाठी टाटा स्टिल पीजीटीआय अग्रमानांकित वीर अहलावत,पीजीटीआयच्या विपणन व टूर डेव्हलपमेंट विभागाचे संचालक विकास सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा स्पर्धेत अग्रगण्य भारतीय खेळाडूंचा समावेश असून त्यात डीपी वर्ल्ड टूर मधील नियमित सहभागी खेळाडू ओमप्रकाश चौहान, पुण्याचा ऑलिंपिकपटू उदयन माने, २०२४ वर्षासाठी टाटा स्टिल पीजीटीआय अग्रमानांकित वीर अहलावत, रशीद खान, करणदीप कोचर, शौर्य बिनु, सचिन बैसोया, वरूण पारीख, धृव शेवराम व शौर्य भट्टाचार्य या खेळाडूंचा सहभाग हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
या स्पर्धेत चेक प्रजासत्ताकचा स्टेपॅन दानेक, बांग्लादेशचे जमाल हुसेन, बादल हुसेन, मोहम्मद अकबर हुसेन व मोहंमद झाकीरू जमान झाकीर, श्रीलंकेचा एन थंगराजा व एनडोराचा केविन इस्टिव्ह रिगेल, नेपाळचा सुभाष तमंग, कॅनडाचा सुखराजसिंग गिल, जपानचा माकोटो इव्हासाकी आणि अमेरिकेचे डॉमिनिक पीसीरीलो व दिगराज सिंग गिल या परदेशी खेळाडूंचे आव्हान राहणार आहे.
यजमान पूना क्लब गोल्फ कोर्सचे प्रतिनिधित्व व्यावसायिक खेळाडू रोहन ढोले पाटील, प्रणव मार्डीकर, अक्षय दामले, प्रवीण पठारे, एरोन रॉकी, गुर्की शेरगिल (माजी पीजीटीआय विजेता), आदित्य भांडारकर, समीर शेख, राजीव दातार, संदीप फळणीकर व जयदीप पटवर्धन करणार असून आरकिन पाटील, आदित्य गर्ग, अवनिश सोमय्याजी या हौशी खेळाडूंचा देखील समावेश आहे.
ही स्पर्धा एकुण ७२ होल स्ट्रोक प्ले प्रकारची असून त्यामध्ये १२३ व्यावसायिक व ३ हौशी अशा एकुण १२६ खेळाडूंचा सहभाग निश्चित झाला आहे. पहिल्या ३६ होल्स नंतर अव्वल ठरलेले पहिले ५० खेळाडू त्यानंतरच्या ३६ होल्सच्या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.
पूना क्लब लिमिटेडचे अध्यक्ष गौरव गढोक यांनी पूना क्लब ओपन गोल्फ स्पर्धेत भारतातील सर्वोत्कृष्ट व्यावसायिक खेळाडूंच्या सहभागाबद्दल आनंद व्यक्त करताना स्पर्धेचे महत्व अधोरेखित केले. या स्पर्धेमुळे पूना क्लबच्या सदस्यांना उच्च दर्जाच्या स्पर्धेबरोबरच व्यावसायिक दर्जाचे कौशल्य पाहण्याची संधी उपलब्ध झाली असून हौशी व कुमार गटातील खेळाडूंना व्यावसायिक खेळाडूंशी स्पर्धा करण्याचीही सुवर्ण संधी यामुळे मिळणार असल्याचे सांगितले.
गढोक पुढे म्हणाले की, या स्पर्धेमुळे पूना क्लब गोल्फ कोर्स हे देशातील सर्वोच्च दर्जाची स्पर्धा आयोजित करण्यासाठीचे योग्य ठिकाण असल्याचे सिद्ध झाले असून सर्व सहभागी खेळाडूंना मी शुभेच्छा देतो.
द पूना क्लब लि. चे उपाध्यक्ष इंद्रनील मुजगुले म्हणाले की पूना क्लब ओपन गोल्फच्या पहिल्या आवृत्तीमध्ये आम्ही भारत आणि परदेशातून सहभागी होणाऱ्या खेळाडूंचे स्वागत करतो . हा आठवडा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरेल अशी आशा आम्ही करतो . दोन वर्षानंतर पूना क्लब गोल्फ कोर्स येथे पीजीटीआय स्पर्धा होत असून यासाठी समर्थन दिल्याबद्दल मुख्य प्रायोजक आणि सहयोगी प्रायोजक यांचे आम्ही आभार मानतो.
पूना क्लब गोल्फ कोर्सचे कॅप्टन जय शिर्के म्हणाले की, पूना क्लब ओपन गोल्फ स्पर्धेचे पहिले सत्र आयोजित करण्याची संधी मिळाल्यामुळे आम्ही अत्यंत आनंदी असून पुण्यासारख्या ठिकाणी इतक्या उच्च दर्जाची स्पर्धा होत असल्यामुळे येथील कुमार व हौशी गोल्फ पटूना मोठीच प्रेरणा मिळणार आहे. आम्ही या स्पर्धेसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या असून पूना क्लब गोल्फ कोर्सवर खेळण्याचा रोमांचकारी अनुभव सहभागी खेळाडूंना निश्चितच आनंद देऊन जाईल.
पूना क्लब गोल्फ कोर्सच्या लेडी कॅप्टन पद्मजा शिर्के म्हणाल्या की, पूना क्लबने गेल्या काही वर्षात अनेक गुणवान महिला व्यावसायिक व हौशी खेळाडू निर्माण केले असून त्या राष्ट्रीय स्तरापर्यंत उत्तम कामगिरी बजावत आहेत. या स्पर्धेमुळे भारतातील सर्वोत्तम व्यावसायिक पुरूष खेळाडूंशी संवाद साधण्याची व त्यायोगे आपला दर्जा उंचावण्याची संधी येथील महिला खेळाडूंना लाभणार आहे.
माजी कॅप्टन व गोल्फ सल्लागार इक्रम खान म्हणाले की या स्पर्धेचे आयोजन ही पूना क्लब गोल्फ कोर्ससाठी ऐतिहासिक घटना असून क्लबचे अध्यक्ष गौरव गढोक यांच्या अथक परिश्रमाचेच ते फळ आहे. पूना क्लबच्या सदस्यांसाठी ही स्पर्धा म्हणजे प्रोअँम व गोल्फ क्लिनिक पर्यंत मजल मारलेल्या अव्वल भारतीय खेळाडूंशी संवाद साधण्याची एक मोलाची संधी ठरणार आहे. ही स्पर्धा यापुढील काळात पूना क्लब गोल्फ कोर्स येथे नियमितपणे आयोजित केली जाईल, असा आमचा प्रयत्न राहील.
पीजीटीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम सिंग मुंडी म्हणाले की, ही अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा पूना क्लब गोल्फ कोर्स येथे आयोजित करण्यासाठी आणि या स्पर्धेसाठी आवश्यक ते प्रायोजक व निधी उभा करण्यात यशस्वी ठरल्याबद्दल मी क्लबचे अध्यक्ष गौरव गढोक , कॅप्टन जय शिर्के, माजी कॅप्टन इक्रम खान व पूना क्लबच्या सर्व संयोजन समिती सदस्यांचे आभार मानतो. पुणे हे आता देशातील प्रमुख गोल्फ स्पर्धांचे महत्त्वाचे केंद्र बनले असून त्यामुळे या ठिकाणी गुणवान व्यावसायिक गोल्फपटू नियमितपणे तयार होत आहेत. त्यामुळेच पूना क्लब गोल्फ कोर्सच्या सहकार्याने ही स्पर्धा आगामी काळात नियमितपणे आयोजित करून पीजीटीआयसाठी तो महत्वाचा टप्पा बनेल, असाच आमचा प्रयत्न राहणार आहे.
द पूना क्लब गोल्फ कोर्स हे या स्पर्धेसाठीचे मुख्य केंद्र व ठिकाण असून १०० एकरांहून अधिक विस्तृत परिसरात पसरलेल्या या कोर्सवर विशाल वट वृक्ष आणि अनेक वृक्षांचा प्रामुख्याने समावेश आहे. हा गोल्फ कोर्स येथील हिरवळीसाठी प्रसिद्ध आहे.या कोर्सवर गेल्या काही वर्षात अनेक राष्ट्रीय व कुमार गटाच्या स्पर्धा पार पडल्या आहेत. या आव्हानात्मक गोल्फ कोर्सवरील चौथ्या होल मध्ये ‘होल इन वन’ (एकाच शॉट मध्ये लक्ष्य साधणे) जो खेळाडू सर्व प्रथम साध्य करेल अशा खेळाडूला निसान मॅग्नेट कार हे खास पारितोषिक देण्यात येणार आहे.