ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांच्या गृहमतदानासाठी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात प्रक्रिया सूरू
पुणे : आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या 85 वर्षे वयावरील 200 ज्येष्ठ नागरिक तसेच 30 दिव्यांग अशा एकूण 230 मतदारांच्या गृहमतदानासाठी दहा पथकाद्वारे प्रक्रिया सूरू झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली आहे.
आंबेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये 15 ते 16 नोव्हेंबर दरम्यान ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना घरबसल्या मतदान करता येणार आहे. वय 85 वर्ष व त्याहून अधिक असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच 40 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असणाऱ्या ज्या मतदारांनी अशी मागणी करण्यासाठी अर्ज केले होते त्यांना गृहमतदान करता येते. यासाठी त्यांनी फॉर्म 12 डी भरून देणे आवश्यक असते.
गृहमतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रत्येक गृह मतदान पथकामध्ये एक मतदान अधिकारी, दोन व्हिडीयोग्राफर, सूक्ष्म निरीक्षक, पोलीस कर्मचारी व दोन शिपाई अशा 7 जणांचा समावेश आहे, अशी माहिती गृहमतदान नोडल अधिकारी विठ्ठल सूर्यवंशी यांनी दिली आहे