खडकवासला विधानसभा मतदारसंघात 68 ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी केले गृह मतदान
पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघांतर्गत 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार अशा एकूण 70 मतदारांनी फॉर्म क्रमांक 12 डी भरून गृहमतदानासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 68 मतदारांनी गृह मतदान केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी गृहमतदानाची सुविधा भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. त्याअनुषंगाने प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करू न शकणाऱ्या 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे डॉ. माने यांनी सांगितले.
भारत निवडणूक आयोगाने एक विशेष टपाल मतपत्रिका सेवा उपलब्ध करून दिली आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात राहणाऱ्या ज्येष्ठ अनेक विकारग्रस्त नागरिकांच्या आणि दिव्यांग नागरिकांच्या घरी भेट देऊन त्यांना घरीच मतदानाची सोय उपलब्ध करून दिली. इतर दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर येण्यासाठी वाहतूक व्यवस्था केली गेली आहे.या उपक्रमामुळे शारीरिक मर्यादा असतानाही प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार बजावता येतो, असे डॉ. माने यांनी सांगितले.
श्री. डॉ. माने यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच टपाली मतदान कक्षाचे समन्वय अधिकारी दिपगौरी जोशी आणि किशोरी शिंदे यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या विशेष पथकाद्वारे गृहमतदानाची प्रक्रिया पार पडली. या पथकामध्ये टपाली मतदान कक्षाचे प्रशासन कर्मचारी लौकिक दाभाडे यांच्यासह मतदान अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक, पोलीस कर्मचारी व व्हिडीओग्राफर यांचा समावेश होता.
मतदारसंघात 85 वर्षांवरील मतदारांची एकूण संख्या 5 हजार 849 असून 55 दृष्टिहीन मतदार आहेत. दृष्टिहीन मतदारांसाठी ब्रेल लिपीतून मतदार चिठ्ठ्या (स्लिप) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदारसंघात 960 दिव्यांग मतदार असून, त्यातल्या 16 दिव्यांग मतदारांना घरी जाऊन मतदान घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली, अशी माहिती दिव्यांग कक्षाचे समन्वयक विनोद हाके यांनी सांगितली. दिव्यांग कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून संदीप चौगुले आणि समन्वयक विनोद हाके काम पाहत आहेत.