अपक्ष उमेदवार विनायक सोपान ओव्हाळ यांना खर्च अहवाल सादर न केल्याबद्दल नोटीस
पुणे :- प्रथम व द्वितीय निवडणूक खर्च तपासणीवेळी निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या अपक्ष उमेदवार विनायक सोपान ओव्हाळ यांना निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी नोटीस बजावली असून नोटीस प्राप्त झाल्यापासून ४८ तासांच्या आत त्यांना दैनंदिन खर्चाचा खुलासा सादर करण्याबाबत निर्देशीत करण्यात आले आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी ९ नोव्हेंबर रोजी तर दुसरी तपासणी १३ नोव्हेंबर,२०२४ रोजी निवडणूक खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मीना यांच्या उपस्थितीत तसेच निवडणूक खर्च तपासणी प्रमुख अश्विनी मुसळे आणि सहाय्यक पवन यादव यांच्या अधिपत्याखाली थेरगाव येथील ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या बापुजी बुवा सभागृहात पार पडली. या दोन्ही खर्च तपासणीवेळी विनायक सोपान ओव्हाळ यांनी लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ चे कलम ७७ व ७८ नुसार निवडणूक खर्चाचा दैनंदिन हिशोब सादर केला नाही त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस प्राप्त झाल्यापासून ४८ तासांच्या आत खुलासा न केल्यास उमेदवाराविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १७७ व लोकप्रतिनिधी कायदा कलम ७८ अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
चिंचवड विधानसभा निवडणूक रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांनी येत्या १८ नोव्हेंबर २०२४ रोजी तिसऱ्या तपासणीवेळी निवडणुक खर्चाचे लेखे चिंचवड विधानसभा मतदारसंघ, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील निवडणूक खर्च नियंत्रण कक्ष येथे सादर करणे बंधनकारक आहे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी केले आहे.