पुणे : काँग्रेसची स्थिती नाजूक आहे. काँग्रेस ज्यांच्या गळ्यात पडते त्या पक्षांचे बुडणे निश्चित आहे. राज्यात काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळ्यात पडली आहे. त्यामुळे या पक्षांचे बुडणे नक्की असल्याची टीका संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी केली. काँग्रेसची स्थिती बिकट असून ती आपल्या पायावर पुन्हा उभी राहू शकत नसल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.

भारतीय जनता पक्ष महायुतीचे शिवाजीनगरचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे आणि पुणे कॅन्टोन्मेंटचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत राजनाथ सिंह यांची बोलत होते. शहराध्यक्ष धीरज घाटे, खासदार मेधा कुलकर्णी, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) संजय सोनवणे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, श्रीनाथ भिमाले या वेळी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, हरियाणातील विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. हरियाणाच्या घवघवीत यशाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात पाहायला मिळणार असून, महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा सत्तेवर येईल, असा दावा त्यांनी केला. राज्यघटना वाचविण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसने १९५१ मध्ये घटनेत बदल करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळा घोटण्याचे काम केले. राज्यघटनेत अनेकदा दुरुस्ती केली. प्रस्तावनेतील मूल्यांवर घाला घालणारीकाँग्रेसआज राज्यघटनेच्या नावाने गळे काढत आहे. राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने जिवंतपणी भारतरत्न दिला नाही,’ अशी टीका सिंह यांनी केली. देशात काँग्रेसची अवस्था बिकट आहे. काँग्रेसने हातमिळवणी केलेला पक्ष रसातळाला जातो. काँग्रेसउद्धव ठाकरेयांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांची परिस्थिती काँग्रेससारखीच होईल. महाराष्ट्र त्यांना ‘एटीएम’प्रमाणे वाटत आहे. ध्येय-धोरणांशी फारकत घेऊन उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेससोबत गेले. त्यांच्या वागण्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांना काय वाटत असेल?, असा सवाल राजनाथ सिंह यांनी केला. महाविकास आघाडीने काही लोकांना १० टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असा भेदभाव करीत नाही. कायद्यानुसार शक्य असेल, तर आरक्षण मिळेल, असेही सिंह यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने कायम गरिबी हटवण्याची घोषणा केली. मात्र, कधीही प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. तेव्हापासून मोदींनी २५ कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढले आहे,’ असा दावा त्यांनी केला