पुणे : पुणे हडपसर येथील भाजपाचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरणानंतर हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाघ यांचे फुरसुंगी फाटा येथून दोन दिवसांपूर्वी सकाळी पहाटेच्या सुमारास चारचाकी वाहनातून चार जणांनी अपहरण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सोमवारी सायंकाळच्या सुमारास आढळून आला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान या घटनेसंबंधी तपास करणाऱ्या पोलीसांनी काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ‘कॉन्ट्रॅक्ट किलींग’चा प्रकार असल्याचे समोर आले आहे. सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी ५ लाख रूपयांची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणात पुणे पोलीसांनी आतापर्यंत चार संशयितांना अटक केली आहे. ज्यापैकी एकजण वाघ यांचा जुना भाडेकरू असून त्यानेच पूर्वीच्या वैमनस्यातून ही सुपारी दिली असल्याचे सांगितले जात आहे.
सतीश वाघ (वय ५५) हे ९ डिसेंबर रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेले होते. यावेळी घराजवळूनच त्यांचे अपहरण करण्यात आले होते. अपहरण झाल्यानंतर तब्बल १२ तासांनी म्हणजेच सोमवारी सायंकाळी त्यांचा मृतदेह पुण्यापासून जवळपास ५० किलोमीटर अंतरावरील यवत जवळच्या शिंदवणे गावात आढळून आला. पोलीस तपासात वाघ यांचा भोसकून खून करण्यात आला असल्याचे तसेच त्यांना मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. सध्या पुणे शहर गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे.
या प्रकरणी बुधवारी संध्याकाळपर्यंत गुन्हे शाखेने चार संशयितांना अटक केली आहे. ज्यापैकी अक्षय जवळकर (२९) हा वाघ यांचा पूर्वीचा भाडेकरू असून त्याने ५ लाखांची सुपारी हल्लेखोरांना दिल्याचा आरोप आहे. तर पोलीसांनी कथितरित्या सुपारी घेऊन हत्या करणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे. पनवकुमार शर्मा (३०), राहणार धुळे, नवनाथ गुरसाळे (३२), राहणार वाघोली आणि विकास शिंदे (२८) अशी उर्वरित तिघांची नावे आहेत.
पुणे शहर पोलीसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “चार संशयितांच्या अटकेची औपचारिकता बुधवारी रात्री पूर्ण केली जात होती. त्यांना पुण्यातली न्यायालयात हजर केले जाईल आणि आम्ही त्यांच्या कोठडी मागणार आहोत. हत्येच्या कारणाची आम्ही अद्याप पुष्टी करत आहोत. वाघ यांनी जवळकर यांना योग्य वागणूक दिली नसल्याचे दिसून येते. पूर्वीचा वाद वाढून पुढे गंभीर बनला की की नाही याचा आम्ही शोध घेत आहोत.”
वाघ हे ९ डिसेंबर रोजी त्यांच्या नियमीत मॉर्निग वॉकसाठी ६ वाजून १५ मिनिटांच्या जवळपास घरातून निघाले. काही मिनिटानंतर ते त्याच परिसरात राहणाऱ्या निलेश सोडनार यांना भेटले. त्यानंतर काही वेळातच वाघ यांना बळजबरीने एसयूव्हीमध्ये बसवत असतानाचा आरडाओरडा सोडनार यांना ऐकू आला. पण हल्लेखोर वाघ यांना घेऊन पसार झाले. त्यानंतर सोडनार यांनी धावत जाऊन कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला आणि त्यानंतर पोलीसांशी संपर्क साधण्यात आला. या प्रकरणात वाघ यांच्या कुटुंबाकडे कोणत्याही खंडणीची मागणी करण्यात आली नव्हती.
पोलिस आयुक्त काय म्हणाले?
या प्रकरणाच्या तपासाबद्दल माहिती देताना पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, गुन्हे शाखा आणि विभागीय युनिट्सच्या आमच्या पथकांनी या प्रकरणाचा बारकाईने तपास केला. तपासाच्या सुरुवातीला जवळपास ४५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले आणि अपहरणासाठी वापरण्यात आलेले वाहन आणि पीडित व्यक्तीची ओळख पटवण्यात आली. हे प्रकरण पूर्व वैमनस्यातून सुपारी देऊन हत्या झाल्याचे असल्याचे उघड झाले. गुन्हे शाखा या प्रकरणाचा अधिक तपास करत असून घटनेच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केले जात आहेत.”